कधी समजून घेणार आहोत आपण ?
- Aurangzeb news in Maharashtra : When will we understand?
X
भारतावर ज्या सहा मुघल सम्राटांनी राज्य केले त्यातला औरंगजेब हा शेवटचा. .त्याच्या आधी होऊन गेलेल्या पाच मुघल सम्राटांच्या कबरी कुठे आहेत ?तर बाबर :लाहोर, हुमायून : दिल्ली ,अकबर : आग्रा ,जहांगीर:लाहोर आणि शाहजहान : आग्रा म्हणजे त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या साम्राज्यातच त्यांच्या कबरी बांधल्या गेल्या आहेत, त्यातल्या काही जागतिक वारसास्थळे म्हणून घोषित केल्या गेल्या आहेत .एकटा औरंगजेबच दख्खनच्या मातीत एका अतिशय साध्यासुध्या कबरीत दफन झाला. खरे तर सार्या हिंदुस्थानावर राज्य करणार्या सम्राटाची कबर त्याच्या आजोबा -पणजोबाप्रमाणे त्याच्या साम्राज्यातल्या एखाद्या निवडक स्थळी ,चारी बाजूंना आखीवरेखीव सुंदर बाग असणारी , एक भव्यदिव्य वास्तुशास्त्रीय शिल्प बनून खडी ठाकायला हवी होती पण तसे झाले नाही. ते का झाले नाही ?ते थोडेसे समजून घेतले असते तर आज औरंगजेबाच्या कबरीच्या निमित्ताने जी स्फोटक परिस्थिति उद्भवली आहे ती उदभवली नसती .

औरंगजेबाची खुलताबाद इथे असलेली कबर मुघल स्थापत्यकलेची मोठी स्मारके असलेल्या इतर मुघल कबरी /मकब-यांपेक्षा अगदीच वेगळी आहे. औरंगजेबला त्याच्या इच्छेनुसार त्याचे धार्मिक आणि आध्यात्मिक गुरु शेख जैनुद्दीन यांच्या दर्ग्याजवळ दफन करण्यात आले असे इतिहास सांगतो .पण याचे मुख्य कारण असेही आहे की मराठ्यांचा पूर्ण बीमोड केल्याशिवाय दिल्लीच्या तख्तावर बसणार नाही म्हणजेच दिल्लीला परत जाणार नाही अशी औरंगजेबाने शपथ घेतली होती . हा मनसुबा असणारा औरंगजेब आपला विशाल सैन्यसागर घेऊन १६८१ मध्ये दक्खनच्या मातीत उतरला खरा पण चिवट मराठी शूरवीरांनी आधी संभाजीराजे ,पुढे राजाराम ,शाहू आणि ताराराणी यांच्या नेतृत्वाखाली त्याला पुढची २६ वर्षे झुंजवत ठेवून त्याचे मनोरथ पार धुळीला मिळवले. त्याने संभाजीराजांची हत्या १६८९ मध्ये केली तेव्हा मराठ्यांचे प्रमुख नेतृत्व हरपले पण जिगरबाज मराठे अजिबात मागे हटले नाहीत .उलट प्राण पणाला लावून असे झुंजत राहिले की औरंगजेबाला जख्ख म्हातारा होईपर्यंत दख्खनमध्येच राहावे लागले, शेवटचा श्वासही इथेच घ्यावा लागला. १७०७ मध्ये औरंगजेबाने दख्खनच्या मातीत अहमदनगर येथे प्राण सोडला तेव्हा तो ८९ वर्षाचा होता. त्याच्या मुलाने त्याचे अवशेष त्याच्या इच्छेनुसार खुलताबाद येथे आणून चिस्ती परंपरेमधल्या औलीयाच्या समाधीजवळ दफन केले.म्हणून त्याची कबर त्याच्या साम्राज्यात नव्हे तर मराठा राज्यात उभारली गेली आणि औरंगजेबाच्या मनसूब्यांची मराठ्यांनी जी दाणादाण उडवली त्यामुळे त्याला दिल्लीला परतता आले नाही हे वास्तव आहे. मी मुद्दाम सगळे सन इथे उदधृत करत आहे कारण संभाजीराजांच्या मृत्यूनंतर १८ वर्षांनी औरंगजेबाचा मृत्यू झाला, तोपर्यंत आणि त्यानंतरही मराठे मुघलांच्या सैन्याशी झुंजत राहिले.

औरंगजेबाला दीर्घायुष्य लाभूनही दख्खनवर काबू करता आला नाही, मराठ्यांचे राज्य नामशेष झालेले बघता आले नाही. 'छावा 'चित्रपटात औरंगजेबाच्या तोंडी एक वाक्य आहे,” संभा अपनी मौत का जश्न मना कर चला गया और हमे मातम मनाने के लिए छोड गया”. आता औरंगजेब खरेच अशा अर्थाचे काही म्हणाला होता की नाही ते कुणास ठाऊक पण स्वतःला आलमगीर (विश्वविजेता,जगाचा पालनकर्ता ईश्वर इत्यादी)म्हणवणारा हा सम्राट संभाजीराजांना खतम केल्यानंतरही मराठ्यांना नेस्तनाबूत करू शकला नाही हा त्याचा केवढा दारुण पराभव होता! त्या नामुश्कीचे दुःख आणि नैराश्य मनात ठेवून प्राण सोडणारा आलमगीर आज त्या कबरीमध्ये दफन आहे, जी महाराष्ट्राच्या हद्दीत आणि सद्दीत इतकी वर्षे सुरक्षित आहे. माझ्या लेखी ते मराठ्यांच्या मर्दुमकीचे , पराक्रम आणि त्यागाचे ...अवघ्या महाराष्ट्राच्या पराक्रमी आणि औदार्यवृत्तीचे प्रतीक आहे.
मग प्रश्न खरे तर पडू नये पण आज परिस्थितीच अशी आहे की या कबरीचे रक्षण करण्याची जबाबदारी कोणाची?
औरंगजेबाची दख्खनमध्ये कबर असणे हे त्याच्या क्रूरतेचे नव्हे , पराक्रमी मराठी बाण्याने नैराश्यात बुडवलेल्या आलमगिराच्या पराभवाचे प्रतीक आहे.शिवभक्तीचा अभिमान बाळगणाऱ्या सर्वांनीच ते कायमचे जतन करायला हवे ,ती आपलीच जवाबदारी आहे.पण गेले दोन दिवस आपल्या राज्यकर्त्यांची जी वक्तव्ये वर्तमानपत्रात ठळक छापून येत आहेत ती निश्चितच हादरवून टाकणारी ,व्यथित करणारी आहेत.' छावा 'तर केवळ एक निमित्त आहे, वाद, भांडण, दंगे-दंगली पेटवणारे हात वेगळेच आहेत, त्यामागचे हेतू आता स्पष्ट दिसू लागले आहेत .
मला इथे प्रश्न असा पडतो की शिवशाहीच्या इतिहासाबद्दल जर एवढी आस्था (आणि औरंगजेबाबद्दल नफरत)आहे तर शिवाजी महाराजांचे गड-किल्ले इतक्या वाईट अवस्थेत का आहेत? ऐतिहासिक कादंबरीकार विश्वास पाटील यांनी वेळोवेळी आपले लक्ष वेधलेले असूनही शहाजी महाराजांची (होडीगेरे ,कर्नाटक ) समाधी इतक्या भणंग दुर्लक्षित अवस्थेत का आहे? जिजाऊची समाधी, लाल महाल, महाराजांचा दरबार आणि सिंहासन यांची आज काय अवस्था आहे ? ज्या महाराणी येसूबाई २९ वर्षे मुघलांच्या कैदेत राहिल्या त्यांची समाधी कुठे आहे, लढवय्या महाराणी ताराराणीची समाधी कुठे आहे,आहे का कुणाला माहिती?

शिवजयंतीचा एक दिवसाचा कार्यक्रम होऊन गेला की वर्षभर तिकडे कोणीही फिरकत नाही. त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी कोणाची? सरकार 'आपली' म्हणवली जाणारी स्मारके सांभाळू शकत नाही.उलट शिवभक्तीच्या नावाखाली जातीधर्मात जाणीवपूर्वक तेढ वाढवली जातेय. आपण त्याला आणखी किती बळी पडणार आहोत हे आपण ठरवायची वेळ आली आहे.
त्यामुळे मी पुन्हा एकदा तेच म्हणेन की औरंगजेबाची कबर हे त्याच्या क्रूरतेचे नव्हे तर त्याच्या दारुण पराभवाचे प्रतीक आहे. शिवशाहीचा अभिमान बाळगणाऱ्यांसाठी ते अभिमानाचे प्रतीक असले पाहिजे. आता त्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी कोणाची? तर माझ्या लेखी ती जितकी केंद्र सरकारची, पुरातत्व विभाग, कबरीची देखभाल करणारे बोर्ड, राज्य सरकार , स्थानिक प्रशासन आणि आपली सर्वांची आहे. महाराष्ट्राच्या रणझुंजार वृत्तीचे प्रतीक म्हणून तरी आपण तिला झळ पोचू देता कामा नये.
या संदर्भात आणखी एक भयंकर धोका मला खुणावू लागला आहे .शहाजी महाराज ते ताराराणी यांची आणि असंख्य मराठी शूरवीरांची समाधीस्थळे आज उघड्यावर आहेत .तिथे ना दिवा ,ना पणती ...ना देखभाली -संरक्षणासाठी एखादा शिपाई नेमला गेला आहे.आज इकडे औरंगजेबाच्या कबरीला धक्का लागला तर तिकडे एखादा हल्ला होणार नाही कशावरून?तसे झाले तर त्या विटंबनेला जवाबदार कोण ? बाबरी मशीद प्रसंगानंतर देशात जो हिंसाचाराचा ज्वालामुखी उफाळला त्याला पुन्हा सामोरे जावे लागेल हे कृपया लक्षात घ्या. तेव्हा सर्वांनीच संयम आणि शिस्तीने वागण्याची गरज आहे .
आणि ऐतिहासिक वारसास्थळांचे जतन आणि संवर्धन हे एकच आव्हान महाराष्ट्रासमोर नाही. महाराष्ट्रासमोर आज अनेक आर्थिक -सामाजिक आव्हाने उभी आहेत, अनेकांनी आपापल्या परीने त्यावर समाजमाध्यमातून लिहिले आहे म्हणून त्यांची पुनरावृत्ती इथे करत नाही. त्या आव्हानांचा सामना करून जनतेच्या भल्यासाठी काही ठोस असे काही कधी घडणार आहे की अशी मुद्दाम पेटवापेटवी करण्यात, कधी पोलिसांना तर कधी प्रसारमाध्यमांना दोष देण्यात राज्यकर्ते आपला वेळ, ऊर्जा आणि संपत्ती खर्च करणार आहेत हा खरा प्रश्न आहे . त्यामुळे आता राज्यकर्त्यांनी लवकरात लवकर शांतता आणि सुव्यवस्था स्थापन करून सर्वधर्मीयांसाठी एक आश्वासक वातावरण तयार करणे गरजेचे आहे. ती आपल्या सर्वांच्याच अग्रक्रमाची बाब असली पाहिजे.
पण ते करताना आपल्या वारसास्थळांचे रक्षण करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे असे म्हणूनही चालणार नाही.तशी चालढकल करण्यातच आपण वेळ घालवला आणि बाबरी प्रकरण घडले . त्या एका घटनेमुळे देशाचे राजकारण बदलले आणि त्याचे दीर्घकाळ होत आलेले दुष्परिणाम आपण आज बघत आहोत.
महाराष्ट्रामधल्या सद्यकालीन गढूळलेल्या वातावरणात कुणी आणखी भर घालू नये .राज्यकर्त्यांनी हाच मोका साधून योग्य पावले उचलून कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करत,जनतेला आश्वस्त करून लोकप्रतिनिधींची स्वच्छ प्रतिमा पुनःप्रस्थापित करण्याची उत्तम संधी सोडू नये. त्या ‘जाणत्या राजा ‘चे राज्य पुन्हा आणण्याच्या मार्गावरचे ते पहिले पाऊल असेल .
त्यामुळे हा प्रश्न केवळ औरंगजेबाच्या कबरीचा नाही.
यशोधरा काटकर