राजकुमार धूत यांना अटक कधी होणार? १ वर्षापासून पगार नसलेल्या कर्मचाऱ्यांचा संतप्त सवाल
X
औरंगाबादच्या व्हिडीओकॉन कंपनीतल्या कर्मचाऱ्यांचा १२ महिन्यांचा थकलेला पगार द्यावा या मागणीसाठी आज कर्मचाऱ्यांनी औरंगाबादमध्ये निदर्शने केली. या कर्मचाऱ्यांना गुलमंडी ते राजकुमार धूत यांच्या बांगल्यापर्यंत मोर्चा काढायचा होता. मात्र, पोलिसांनी त्यासाठी परवानगी नाकारली. त्यामुळे गुलमंडी चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी घोषणाबाजी करण्याऱ्या सुमारे २०० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
गेल्या ७२ दिवसांपासून हे कर्मचारी औरंगाबादच्या कामगार उपायुक्त कार्यालयासमोर साखळी उपोषण करत आहेत. एक वर्षापासून व्हिडीओकॉन कंपनीशी संलग्नित 'ऑटोकार्स' कंपनीच्या ३४० कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानाही मालक आदेशाला जुमानत नाही. सत्ताधारी राजकीय पक्षाचा वरदहस्त असल्याने धूत यांना संरक्षण मिळत असल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.
व्हिडीओकॉन ग्रुपचे प्रमुख आणि शिवसेना खासदार राजकुमार धूत आणि वेणूगोपाल धूत यांनी ५० बँकांचे ५८७३० कोटी रुपयांचे कर्ज बुडवले आहे. याप्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांची 'ईडी'कडून चौकशी झाली. कर्ज बुडवल्याप्रकरणी धूत बंधूंना अटक कधी होणार असा सवाल या कर्मचाऱ्यांनी केला.