जेव्हा एका तेजाची दुसऱ्या तेजाशी भेट होते; वेरुळ लेणीतील नेत्रदिपक सोहळा
X
महाराष्ट्रातील लेणी अभ्यासक सुरज जगताप यांनी छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) येथील वेरूण लेणीतील बुध्दमुर्तीवर पडणाऱ्या सोनेरी सुर्यप्रकाशामुळे ती मुर्ती तेजोमय दिसत असल्याची पोस्ट आपल्या फेसबूक अकाउंटवरून शेअर केली आहे.
जगताप म्हणाले की, वर्षातून फक्त एकदाच उत्तरायणातील सुर्यप्रकाशाचा सोनेरी किरणोत्सव वेरुळ लेणीत १० आणि ११ मार्च या दोन दिवशीच असतो. यावेळी बुध्दमुर्तीच्या चेहऱ्यावर पडलेल्या सुर्यकिरणांमुळे जे तेज बुध्दमुर्तीवर दिसत होते त्याचे वर्णन करताना जगताप म्हणाले,
तेजःपुंज प्रभावलययुक्त सोनेरी किरणांनी उजळून निघालेली सम्यक सम्बुध्द यांची आभा आज याची देही याची डोळा पाहीली, मंद उजेड असलेल्या चैत्यगृहातील गाभाऱ्यात उत्तरायणातील मावळतीला जाणाऱ्या सूर्यकिरणांनी काही काळ सम्यक सम्बुध्द यांचा चेहरा आणि चैत्यगृह उजळून काढला, धम्म चक्र प्रवर्तन मुद्रेतील प्रलंबपाद अवस्थेतील सम्यक सम्बुध्द यांच्या शिल्पाच्या पायापासून सूर्यास्ताची किरणे सांयकाळी बरोबर चार वाजून दहा मिनिटांनी हळू हळू मुखाच्या दिशेने सरकायला सुरुवात झाली ही सोनेरी किरणे सम्यक सम्बुध्दांच्या मुखावर काही काळ स्थिरावण्यासाठी बरोबर तासभर लागला म्हणजे पाच वाजून दहा मिनिटांनी अंधारलेल्या पार्श्वभूमीवर एक तेजःपुंज चेहारा सोनेरी किरणांनी उजळून निघाला होता जणू काही एका तेजाची दुसर्या तेजाशी भेट.
दरम्यान हा संपूर्ण प्रसंग महाराष्ट्रातील एकमेव छत्रपती संभाजीनगर/औरंगाबाद इथल्या वेरूळ लेणी समूहातील दहा क्रमांकाच्या लेणीत संपन्न होतो , प्राचीन काळातील स्थापत्य विशारदांनी खगोलशास्त्र आणि स्थापत्य यांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक घडवून आणलेले अफलातून सादरीकरण , शतकानूशतके सुरू असलेला हा संपूर्ण नेत्रदीपक नैसर्गिक सोहळा आपल्या चक्षूद्वारे आपल्या स्मृतीपटलावर कायमचे उमटवून घेण्यासाठी अनेक कलासक्त जिज्ञासू मने इथे हजर होती जी संपूर्ण राज्यभरातून व देशभरातून आली होती काही विदेशी पर्यटकांनी देखील हा सोहळा अनुभवला असल्याचं जगताप यांनी सांगितलं.
@सूरज रतन जगताप
(लेणी अभ्यासक)