जवानांचे बलिदान कधी थांबणार? सामना
370 कलम रद्द केल्याने कश्मीर खोऱ्यातील दहशतवादी कारवाया कमी झाल्या असे नगारे वाजवले गेले , पण तसे खरेच झाले आहे काय ? जैश – ए – मोहंमदचा कुख्यात कमांडर सज्जाद अफगाणीचा खात्मा आपल्या सुरक्षा दलांनी आता केला हे चांगलेच झाले , पण कश्मीर खोऱ्यात दहशतवादाची पाळेमुळे आज कायम आहेत तीन वर्षांत अतिरेकी हल्ल्यांत हिंदुस्थानचे 305 जवान शहीद झाले . कुठलेही थेट युद्ध लढत नसताना जवानांना हे बलिदान द्यावे लागत आहे . ते कधी थांबणार आहे ? असा सवाल सामना संपादकीयमधे उपस्थित करण्यात आला आहे.
X
हिंदुस्थानच्या सुरक्षा दलांनी आणखी एक धडाकेबाज ऑपरेशन यशस्वी केले आहे. जम्मू-कश्मीरच्या शोपियां जिह्यात तब्बल तीन दिवस चाललेल्या तुंबळ धुमश्चक्रीत जैश-ए-मोहंमद या अतिरेकी संघटनेच्या कुख्यात कमांडरला जवानांनी कंठस्नान घातले आहे. विलायत लोन ऊर्फ सज्जाद अफगाणी हा जैशचा मोस्ट वॉण्टेड कमांडर मारला गेला हे सुरक्षा दलांचे मोठेच यश आहे. अफगाणीचा खात्मा करणाऱ्या जांबाज जवानांची आणि या ऑपरेशनमध्ये सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांची पाठ थोपटायलाच हवी. कारण मारला गेलेला अफगाणी हा काही सामान्य अतिरेकी नव्हता. जैश-ए-मोहंमद या अतिरेकी संघटनेचे तमाम म्होरके लागोपाठ मारले गेल्यानंतर अफगाणीने कश्मीर खोऱ्यात नव्याने जैशचे नेटवर्क उभे केले होते. कश्मीरातील तरुणांची माथी भडकावून त्यांना अतिरेकी संघटनेत सामील करण्याचा सपाटाच त्याने लावला होता. जैशमध्ये असंख्य तरुणांची भरती करण्याबरोबरच कश्मीरातील अनेक दहशतवादी हल्ल्यांतही अफगाणीचा हात होता. सुरक्षा दलांच्या हिटलिस्टवर असलेल्या अफगाणीला 'जिंदा या मुर्दा' पकडण्यासाठी कश्मीर खोऱ्यात ठिकठिकाणी शोधमोहिमा हाती घेण्यात आल्या होत्या. त्यातच शनिवारी शोपियां जिह्यातील रावलपोरा येथे अफगाणी लपून बसल्याची पक्की खबर सुरक्षा दलांना मिळाली.
जवानांनीएका घरात लपून बसलेल्या अफगाणीने गोळीबार सुरू केला. अनेक तासांच्या चकमकीनंतर जवानांनी स्फोटकांचा वापर करून ते घरच उडवून लावले. यात अफगाणीचा एक साथीदार मारला गेला, पण अफगाणी व अन्य एक अतिरेकी पळून गेले. मात्र, बहाद्दर जवानांनी पाठलाग करून सोमवारी अखेर अफगाणीचा खात्मा केलाच. मात्र, अफगाणी संपला म्हणजे कश्मीरातील दहशतवाद संपला असे म्हणता येणार नाही. कश्मीरातील अतिरेक्यांची पाळेमुळे जोपर्यंत नष्ट होत नाहीत आणि पाकिस्तानातून होणारी अशा अफगाणींची पैदास थांबत नाही, तोपर्यंत दहशतवादाचा नायनाट होणार नाही. सुरक्षा दलांनी धडाकेबाज कारवाया करून गेल्या काही वर्षांत अतिरेक्यांचे मोठय़ा प्रमाणात एन्काऊंटर सुरू केले आहे. या कारवायांमध्ये अतिरेकी मोठय़ा संख्येने मारलेही जात आहेत. मात्र, जम्मू-कश्मीरमधील दहशतवादाचे थैमान आणि अतिरेक्यांचा सुळसुळाट अजूनही थांबायला तयार नाही. पुन्हा तेवढीच अतिरेक्यांची पिलावळ पैदा होते आणि दहशतवादी व अतिरेकी कारवायांचे सत्र काही केल्या थांबत नाही. जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादाचा जन्म झाल्यापासून हे असेच चित्र आहे व कोणी कितीही दावे करीत असले तरी जमिनीवरील हे चित्र अजून तरी 'जैसे थे'च आहे. अतिरेकी संघटनांना पुरविणाऱ्या पाकिस्तानचा बंदोबस्त केल्याशिवाय जम्मू-कश्मीरमधील दहशतवाद संपणार नाही हे वारंवार सिद्ध होऊनही पाकिस्तानने सुरू केलेल्या छुप्या युद्धाचे आपण शिकार झालो आणि त्यातच गुरफटून बसलो. 370 कलम रद्द केल्याने कश्मीर खोऱ्यातील दहशतवादी कारवाया कमी झाल्या असे नगारे वाजवले गेले, पण तसे खरेच झाले आहे काय? जैश-ए-मोहंमदचा कुख्यात कमांडर सज्जाद अफगाणीचा खात्मा आपल्या सुरक्षा दलांनी आता केला हे चांगलेच झाले, पण कश्मीर खोऱ्यात दहशतवादाची पाळेमुळे आज कायम आहेत असाच त्याचा अर्थ आहे. मागच्या तीन वर्षांची आकडेवारी पाहिली तर या कालावधीत सुरक्षा दलांनी धडाकेबाज मोहिमा राबवून 635 अतिरेक्यांना कंठस्नान घातले. मात्र, याच तीन वर्षांत विविध ठिकाणी झालेल्या अतिरेकी हल्ल्यांत हिंदुस्थानचे 305 जवान शहीद झाले. कधी सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात तर अतिरेक्यांच्या घातपाती कारवायांत आपले जवान धारातीर्थी पडतात. तिरंग्यात लपेटलेल्या तरण्याबांड जवानांचे पार्थिव घरी परत येते तेव्हा सारा गाव त्या जवानाला निरोप देताना शोकाकुल होतो. कधी या राज्यात तर कधी त्या राज्यात शहीद जवानांचे पार्थिव येण्याचा हा सिलसिला काही थांबत नाही. कुठलेही थेट युद्ध लढत नसताना जवानांना हे बलिदान द्यावे लागत आहे. ते कधी थांबणार आहे? असा प्रश्न सामानाने उपस्थित केला आहे.