यशोमती ठाकूर यांच्या ‘त्या’ इशाऱ्याचा अर्थ काय?
X
राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय चर्चेला उधाण आले आहे. “माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यांना घेऊन फिरत आहेत ते खरंतर बाहेरुन आलेले लोक आहेत. भाजप पक्ष दुर्बल झाला आहे. भाजपच्या 105 आमदारांमध्ये कित्येक जण आमच्यापैकी त्यांच्यात गेलेले आहेत. ते कधीही आमच्याकडे येतील. आमच्या संपर्कात कोण आहे, हे तुम्हाला कळलं तर फार मोठा भूकंप होईल,”असा इशारा त्यांनी दिला आहे.
राजस्थानमधील राजकीय घडामोडींनंतर महाराष्ट्रात काय होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर यशोमती ठाकूर यांनी इशारा दिल्याने याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
यशोमती ठाकूर यांच्या इशाऱ्यानंतर निर्माण झालेले प्रश्न
१. सरकार ५ वर्ष टिकणार असल्याचा आघाडीच्या नेत्यांना विश्वास असल्याने भाजपमधून आऊटगोईंगची सुरूवात होणार आहे का?
२. भाजपने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांना संपर्क साधला आहे का?
३. राज्यातील सरकार अस्थिर करण्यासाठी भाजप नेते दिल्लीत वरिष्ठांच्या भेटीगाठी घेत आहेत का?
४. काँग्रेसला आपले आमदार फुटण्याची भीती वाटते आहे का?
५. महाराष्ट्राने नवीन राजकीय समीकरण देशाला दिले असले तरी येत्या काळात आणखी काही नवीन राजकीय समीकरण दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे का?
६. भाजपमधील अनेक लोक काँग्रेसच्या संपर्कात आहेत तर मग ते कसली वाट पाहत आहेत?
सरकार पडले तर काय होऊ शकते?
शक्यता क्रमांक - १
राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडले तर भाजप आणि शिवसेना सरकार स्थापन करु शकतात. पण शिवसेना आणि भाजपमध्ये निर्माण झालेल्या दुराव्यामुळे तूर्तास ती शक्यता दिसत नाही.
शक्यता क्रमांक – २
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सरकार स्थापन करु शकतात.
पण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकतीच अशी कोणतीच शक्यता नसल्याचे स्पष्ट केले आहे.
शक्यता क्रमांक – ३
राष्ट्रपती राजवट लागू करुन भाजपला संख्याबळाची जुळवाजुळव करण्यास वेळ मिळवून दिला जाऊ शकतो. पण कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती राजवटीचा पर्याय सध्या कठीण वाटतो.
या सर्व शक्यता असल्या तरी येत्या काळात काय राजकीय घडामोडी घडतात ते पाहणं महत्वाचे ठरणार आहे.