ईडी चौकशीसाठी कार्यालयात दाखल झाल्यावर काय म्हणाले अमोल किर्तीकर? वाचा
X
मुंबई उत्तर पश्चिम ठाकरे गट उमेदवार असलेले अमोल कीर्तिकर यांना ईडीने कोव्हीडच्या काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी बोलावण्यात आलं. अमोल किर्तीकर हे मुंबईतल्या अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कार्यालयात दाखल झाले आहेत. लोकसभा निवडणूका अगदी तोंडावर असताना त्यांना ईडीकडून सदरील घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं आहे. विशेष बाब अशी की, शिवसेना ठाकरे गटाकडून त्यांना मुंबई (उत्तर-पश्चिम) लोकसभा मतदारसंघातून नुकतीच उमेदवारी देखील देण्यात आली आहे. त्यामुळे या ईडी चौकशीनंतर काय होईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कोव्हीड च्या काळात स्थलांतरीत मजुरांना खिचडी वाटपाच्या करारातील अनियमिततेशी संबंधित आहे अशी माहिती समोर आली आहे. याप्रकरणाविषयी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर मुंबई महानगरपालिकेसह ६ कोटींहून अधिक रूपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. खिचडीचे कंत्राट फोर्स वन मल्टिसर्हिसेस नावाच्या कंपनीला देण्यात आले होते. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कीर्तीकरांची याअगोदरच चौकशी करण्यात आली आहे.
ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर होताच ईडीचे संकट
कोरोना महामारीच्या काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी अमोल कीर्तिकर यांना ईडीकडून 27 मार्च रोजी चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले होते. शिवसेना ठाकरे गटाकडून त्यांच्या मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीची घोषणा होताच काही तासांमध्येच त्यांना तपास यंत्रणेकडून फोन आला. यावर निशाणा साधत उध्दव ठाकरे गटाने केंद्र सरकारवर तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याप्रकरणी पुन्हा आरोप केला आहे.
ईडी चौकशीवर काय म्हणाले अमोल कीर्तिकर?
यापूर्वीसुध्दा अमोल कीर्तिकरांना ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, पण त्यावेळी त्यांचा दौरा असल्याकारणाने ते जाऊ शकले नाहीत, असं त्यांनी सांगितले आहे. किर्तीकर पुढे बोलताना असंही म्हणाले की, ईडीच्या चौकशीला मी घाबरलेलो नाही, आवश्यक ती तयारी केली असल्याचेही किर्तीकर यांनी केली असल्याचेही यावेळी सांगितले आहे.