मतदानाच्या ७२ तास अगोदर प्रचार थांबणार, संध्याकाळी ७ नंतर प्रचार नाही…
मतदानाच्या ७२ तास अगोदर प्रचार थांबणार, संध्याकाळी ७ नंतर प्रचार नाही, काय आहेत प्रचाराचे नवीन नियम वाचा..
X
कोरोना विषाणूमुळे वाढत चाललेल्या भयावह परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूका एकाच टप्प्यात घ्या. अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली होती. पश्चिम बंगाल मध्ये८ टप्प्यात मतदान होत असून अजून चार टप्पे बाकी आहेत. ममता बॅनर्जी यांच्या या मागणीनंतर या संदर्भात आज पश्चिम बंगालचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व पक्षीय बैठक बोलवली होती. यामध्ये हा निर्णय घेण्यात आले आहेत. संध्याकाळी ७ नंतर आता कोणताही राजकीय पक्ष बंगालमध्ये मोर्चा काढू शकणार नाही किंवा प्रचार करू शकणार नाही, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
काय आहे नवीन नियम?
मतदानाच्या ७२ तासांपूर्वीच निवडणूकीचा प्रचार बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी ही मुदत ४८ तासांची होती. मात्र, बंगालमधील उरलेल्या सर्व निवडणुकीचा चरणामध्ये ७२ तासांपूर्वीच प्रचार बंद केला जाईल असा निर्णय देण्यात आला आहे.
तसेच निवडणूक प्रचारादरम्यान रात्री ७ ते १० या वेळेत प्रचार करणे किंवा प्रभातफेरी काढणे यावर बंदी घालण्यात आलेली आहे. याशिवाय कोरोना नियमांचे पालन करणे सर्व राजकीय पक्ष आणि उमेदारांना अनिवार्य असेल. जर तसे झाले नाही तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
सर्व सदस्यांनी, कार्यकर्त्यांनी मास्कचा वापर करणे आणि नियम पाळणे यावर लक्ष ठेवण्याचे काम आयोजकांचे असल्याचे सुद्धा निर्बंधांमध्ये सांगण्यात आले आहे.