Weather Alert : विदर्भ मराठवाड्यासह राज्यात मुसळधार पावसाची शक्यता ; वाचा काय आहे हवामान खात्याचा अंदाज ?
X
हवामान अंदाज : राज्यातल्या काही भागातून थंडीचं प्रमाण कमी झालं असून आता उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरूवात झाली आहे. गरमीच्या उकाड्यामुळे राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण तयार झाल्याने काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडत असून विदर्भातील अनेक जिल्ह्यांना गारपीटीने चांगलाच तडाखा दिला आहे. त्यामूळे शेतीच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नूकसान झाल्याचं पहायला मिळत आहे. हवामान खात्याने आज सुध्दा राज्यात काही ठिकाणी पावसाचा इशारा दिलाय.
मंगळवार आणि बुधवारी राज्यातल्या काही भागामध्ये मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज पुणे हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पुढील दोन-तीन दिवस राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची दाट शक्यता असून मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पाऊस पडेल, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, येत्या ४८ तासांत राज्यातील विदर्भासह मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटांसह हलक्या-मध्यम पावसाच्या सरी बरसतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी त्यादृष्टीने पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही हवामान खात्याकडुन देण्यात आला आहे.
मराठवाड्यातल्या या जिल्ह्यात पावसाची शक्यता
कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील २८ जिल्ह्यांमध्ये गारपीट होईल अशी कोणतीही शक्यता नाही, मात्र जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात हलक्या-मध्यम स्वरुपात पावसाची शक्यता आहे. तर उर्वरीत जिल्ह्यात मात्र ढगाळ वातावरण राहील, असंही हवामान खात्यानं सांगितलं आहे.
विदर्भातील पावसाचा अंदाज
राज्यात विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला असून, काही जिल्ह्यांमध्ये गारपीट देखील होऊ शकते, असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय.