पारनेर तालुक्यातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करू- तटकरे
X
पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कोल्ड स्टोरेज, आणि शेती मालावर प्रक्रिया करण्याचे युनिट सुरू करण्याची मागणी लवकर मार्गी लावली जाईल, सोबतच तालुक्यातील युवकांसाठी भव्य क्रीडा संकुल देखील उभारण्यासाठी त्या खात्याची मंत्री म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करेल असे आश्वासन राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधि व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिले. त्या पारनेर तालुक्यातील विविध विकास कामांचा शुभारंभ प्रसंगी बोलत होत्या.
दरम्यान विकासकामे मार्गी लावण्यासाठी राज्य स्तरावर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांचा मोठा पाठपुरावा असतो. त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी आवश्यक ते सहकार्य करू, असे प्रतिपादन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी केले.
यावेळी आमदार निलेश लंके, राजेंद्र फाळके, अशोक सावंत, अशोक कटारिया, बाबाजी तरटे, संजीव भोर यांच्यासह विविध मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
राज्यमंत्री तटकरे यांच्या हस्ते नगर - पारनेर मतदार संघातील खडकवाडी मांडवा, मांडवा देसवडे पोखरी, रस्ता कामाची सुधारणा आणि मौजे खडकवाडी येथे गाव अंतर्गत हनुमान मंदिर रस्ता काँक्रीटीकरण करणे आदी सुमारे ४ कोटी ६५ लाख रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन राज्यमंत्री तटकरे यांच्या हस्ते झाले.
यावेळी बोलताना राज्यमंत्री तटकरे म्हणाल्या, पारनेर तालुक्यातील काही गावे कोकणातील गावसारखी आहेत. त्यांच्या विकासासाठी आणि त्यांना पायाभूत सुविधा देण्याचा प्रयत्न आमदार लंके यांच्या माध्यमातून होत आहे. कोरोना काळात नागरिकांच्या आरोग्यासाठी त्यांनी उभी केलेल्या व्यवस्थेचे कौतुक संपूर्ण राज्यात झाले. त्यांनी मतदारसंघातील गावांच्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच गावाच्या प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावांना निश्चितपणे सहकार्य करू, असे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार लंके म्हणाले, मी येथील नागरिकांच्या प्रती बांधील आहे. येथील विकास कामे मार्गी लावण्यासाठी माझा पाठपुरावा असतो. त्याला बळ देण्यासाठी राज्यमंत्री तटकरे यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे. मतदारसंघातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी भरीव मदत मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी खडकवाडी आणि परिसरातील नुकतेच सैन्यदलातून निवृत्त झालेल्या चार माजी सैनिकांचा सत्कार यावेळी करण्यात आला. कोरोना काळात चांगले काम करणाऱ्या आशा सेविका, नर्स यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी परिसरातील विविध गावांच्या सरपंच आणि पदाधिकारी यांनी गावातील विविध प्रश्न आणि मागण्याची सोडवणूक करण्याची विनंती केली. त्याला राज्यमंत्री तटकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. कार्यक्रमास विविध गावांचे सरपंच, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.