2024 पर्यंत आम्हाला आणि महाराष्ट्रालाही सहन करायचे आहे- संजय राऊत
X
मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून आमचे गळे आवरण्याचा प्रयत्न केला पण आमच्या तोंडातून सत्यच निघेल, असे उत्तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. राजकीय फायद्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करायचा, चुकीचे आरोप करायचे, कॅबिनेट मिनिस्टरला अटक करायची आणि नंतर तुम्ही आंदोलने देखील करायचे,त्यामुळे आमच्याकडे मुख्यमंत्र्यांना देखील अधिकार आहेत की कोणाचा राजीनामा मंजूर करायचा आणि कुणाचा राजीनामा फेटाळायचा" या शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी इनकम टॅक्स विभागाने टाकलेल्या धाडीवरही संजय राऊत यांनी टीका केली आहे. "महानगरपालिका निवडणुका येत आहेत, महिनाभरात त्याची प्रक्रिया सुरू होईल, त्यामुळे महानगरपालिकेच्या शिपायांवर सुद्धा रेड टाकली जाईल," असा टोला त्यांनी लगावला. 2024 पर्यंत हा त्रास आम्हाला आणि महाराष्ट्राला देखील सहन करायचा आहे, पश्चिम बंगाल, झारखंड, पंजाब यांना देखील हाच त्रास सहन करायचं आहे पण 2024 नंतर बघू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. डर्टी पॉलिटिक्स खेळणारे भाजपचे डर्टी ट्वेल्व्ह आहेत, असेही उत्त्तर त्यांनी दिले. आदित्य ठाकरे यांना उत्तर प्रदेशात प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचा दावा त्यांनी केला. तुमचे लोक रोज गंगेत स्नान करतात आणि पाप करतात त्यामुळे गंगा जास्त मैली झालेली आहे, अशीही टीका त्यांनी केली.