"BHR प्रकरणात आपला एक पैशाचाही व्यवहार नाही", आमदार मंगेश चव्हाण यांचं पत्रकार परीषदेत वक्तव्य
X
BHR घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी सुनील झंवर याच्या अटकेनंतर त्याच्याकडील अनेक गोष्टी पोलिसांनी जप्त केल्या होत्या. सुनील झंवरकडून पोलिसांना मिळालेल्या हार्डडिस्क आणि डायरीमध्ये चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांना कोट्यवधी रुपये दिल्याचा उल्लेख आढळल्यानंतर राज्यभरामध्ये एकच खळबळ माजली होती. गेल्या काही दिवसांपासून पुणे आर्थिक गुन्हे शाखेने नेमका काय तपास केला याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी मागितली होती, पोलिसांनी मात्र गोपनीय माहिती वगळता इतर माहिती चव्हाण यांना दिली होती. याप्रकरणी आमदार मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परीषद घेतली आणि अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.
BHR घोटाळ्यात अटकेत असलेले सुनील झंवर हे पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री एकनाथ खडसे, गिरीश महाजन यांच्यासह अनेकांचे निकटवर्तीय आहेत, असं वक्तव्य भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी केलं. आणि उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या गिरीश महाजन यांचीच री ओढली.
याशिवाय BHR घोटाळ्यातील संशयित आरोपी सुनील झंवर याच्याशी आपला कोट्यवधींचा व्यवहार झाल्याच्या बदनामी करणाऱ्या बातम्या येत आहेत त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत , कोणतेही पुरावे नसतांना माझ्या बाबतीत वृत्त प्रसारित करणाऱ्या माध्यमांवर कायदेशीर कारवाही करणार असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी सांगितलं.
BHR च्या व्यवहारात आपला कोणताही संबध नाही सुनील झंवर चा आपला एक पैश्याचाही व्यवहार झाला नसल्याचा दावा आमदार मंगेश चव्हाण यांनी केला. तसेच ठेवीदारांना पैशे मिळून देण्याच्या नावाखाली काही लोकांनाच टार्गेट केलं जातं आहे , शिवाय BHR ची व्याप्ती देशभर असतांना सूडभावनेने मोजक्या लोकांवर कार्यवाही केली जात आहे असा आरोपही आमदार चव्हाण यांनी यावेळी केला.
BHR प्रकरणाचा तपास कसा चालला आहे याबद्दल आवश्यक ती माहिती आपण तपास यंत्रणेकडून लोकप्रतिनिधी नात्याने मागितली होती यातून बरीच माहिती मिळाली आहे. ही माहिती योग्य वेळी माहिती विधानसभा पटलावर ठेवणार असल्याचं आमदार चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
BHR प्रकरणी अटकेत असलेले सुनील झंवर याच्याकडील हार्डडिस्क तसेच डायरीत भाजप आमदार चव्हाण आणि झंवर यांच्यात कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचा दावा काही वृत्तपत्रांनी केल्यानंतर आमदार चव्हाण यांनी यानिमित्ताने तपास यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह उभे केले आहेत.
हार्डडिस्क तसेच डायरीतील नेमकी माहिती काय..
मुख्य संशयित सुनील झंवर यांना पुणे न्यायालयाने २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता सुनील झंवर पोलिसांना चौकशीमध्ये आणखी कोणकोणती माहिती देणार, कोणते खुलासे करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. नऊ महिन्यांपूर्वी पुणे आर्थिक शाखेच्या पथकाने सुनील झंवर यांच्या कार्यालयात छापा टाकून अनेक महत्वपूर्ण कागदपत्रं, सरकारी शिक्के, आमदार तसेच मंत्र्यांचे लेटरपॅड जप्त केले होते. त्यात एक डायरी आणि हार्डडिस्क सापडली होती. या डायरीत कोट्यवधी रुपयांची देवाण घेवाण झाल्याचा उल्लेख आहे. डायरीच्या एका कागदावर आमदार मंगेश चव्हाण यांना १ कोटी ५५ लाख रुपये तर दुसऱ्या नोंदीत ४ कोटी ५० लाख दिल्याची नोंद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.