टरबुजाच्या झाडालासुद्धा पाणी लागतं - उद्धव ठाकरे यांनी पुन्हा फडणवीसांना डिवचलं
X
एकदा त्यांना फडतूस बोललो होतो, आता नाही बोलणार. एकदा कलंक बोललो होतो, आता नाही बोलणार. आता थापाड्या बोलायचं होतं, पण आता नाही बोलणार म्हणत फडणवीस यांच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी मिश्कील वक्तव्यं केलंय.
शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दौरे करायला सुरूवात केलीय. उद्धव ठाकरे यांनी आज हिंगोलीत निर्धार सभा घेतली. हिंगोली हा आमदार संतोष बांगर यांचा मतदारसंघ आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपसह शिंदेगटावर सडकून टीका केली. बांगर यांच्या मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपावर निशाणा साधला.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, “देवेंद्र फडणवीसांवर तर मी बोलायचंच सोडून दिलंय. मी काहीही म्हटलं तरी त्याचा 'बोभाटा' होतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले. “मी आधी एकदा त्यांना फडतूस बोललो होतो, आता नाही बोलणार. एकदा कलंक बोललो होतो, आता नाही बोलणार. आता थापाड्या बोलायचं होतं, पण आता नाही बोलणार. कारण मी काही बोलायचं ठरवलं तरी त्याचा बोभाटा होतो. पण ते राज्यात दुष्काळ पडला असताना जपानला गेले”, अशी मिश्कील टीका ठाकरे यांनी केली. “टरबुजाच्या झाडालासुद्धा पाणी लागतं”, असं ठाकरे म्हणाले. असं म्हणताच त्यांनी पुढे “मी असं काही म्हणत नाही. अजिबात म्हटलेलं नाही” असा खुलासाही केलाय.
दरम्यान, उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, “आता ते जपानला गेले होते. चांगली गोष्ट आहे की कुणाला तरी वाटलं की राज्यात उद्योगधंदे आले पाहिजे. इकडे दुष्काळ पडलेला असतानाही जपानला गेले. तिकडे डॉक्टरेट घेतली. तुमचा हा प्रयत्न स्तु्त्य आहे. कलंक, फडतूस वगैरे बोलणार नाही. पण महाविकास आघाडीच्या काळात जे उद्योगधंदे राज्यात आले होते, जे उद्योग राज्याच्या उंबरठ्यावर होते, ते तुमच्या डोळ्यांदेखत राज्याच्या बाहेर गेले”, अशी टीकाही ठाकरेंनी केली.