चंद्रभागेचे पाणी पिण्यास अयोग्य, नदीच्या शुद्धीकरणाचे काय?
X
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणार्या सावळ्या विठूरायाच्या माघी यात्रेनिमित्त हजारो भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. ज्या चंद्रभागेच्या पाण्याला स्पर्श करुनही विठ्ठलाचा आशीर्वाद मिळतो अशी श्रद्धा असंख्य भाविकांच्या मनात आहे, त्याच चंद्रभागेबाबत मात्र धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. चंद्रभागेचे पाणी पिण्यासाठी अयोग्य आहे, असा अहवाल महाराष्ट्र शासनाच्या भुजल सर्वेक्षण विभागाने दिला आहे. चंद्रभागेच्या पात्रात प्रचंड असं घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी आवाज उठवला आहे, तसेच या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
अंकुशराव यांनी पाण्याच्या शुध्दतेची तपासणी राज्यसरकारचा पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा उपविभागीय प्रयोगशाळा यांच्यामार्फत करून घेतली आहे. याच अहवालात हे पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. माघी वारीनिमित्त गेल्या अनेक दिवसांपासून पंढरीत दाखल झालेले हजारो वारकरी चंद्रभागेचे हेच दुषीत पाणी तीर्थ म्हणून पीत आहेत. हे दुषीत पाणी पिऊन जर एखाद्या भाविकाच्या जीवितास धोका झाला तर याला जबाबदार कोण ? असा प्रश्न ही अंकुशराव यांनी उपस्थित केला आहे.