पुरोगामी महाराष्ट्राला धक्का, कौमार्य चाचणीचा व्हिडिओ व्हायरल
X
पुरोगामी महाराष्ट्रात अजूनही कौमार्य चाचणीचे प्रकार सुरू असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. सध्या २०१८ मध्ये एका नववधूच्या कौमार्य चाचणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये लग्नाच्या रात्री हॉटेलच्या एका खोलीत नववधू व नवरदेव दिसत आहेत. पांढऱ्याशुभ्र वस्त्रावर झोपल्यानंतरचा त्यावर पडलेला रक्ताचा लाल डाग नवधू दाखवत असल्याचा हा धक्कादायक व्हिडिओ आहे. तसे वस्त्र नववधू आपल्या हाताने दाखवत आहे. हा व्हिडिओ 2018 चा असला तरी जात पंचायतचे क्रौर्य व अमानुष कुप्रथा समोर आणणारा आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावर त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामध्ये सरकारने या कुप्रथेची गंभीर दखल घेऊन ती बंद करण्यासाठी प्रयत्न करायला हवे, अशी मागणी जात पंचायत मूठमाती अभियानाचे कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती कौमार्य चाचणी विरोधात लढत आहे. समितीच्या प्रयत्नाने ही पाचशे वर्षांची कुप्रथा समाजासमोर आणली गेली आहे. परंतु त्याबाबत पुरावा मिळत नव्हता. तो पहिल्यांदाच समितीच्या हाती लागलेला आहे. नाशिकमध्ये रविवारी एक विवाह पार पडला. त्यामध्ये कौमार्य चाचणी घेणार असल्याची तक्रार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जात पंचायत मूठमाती अभियानाला प्राप्त झाली होती. त्याप्रमाणे त्र्यंबकेश्वर पोलीसांच्या मदतीने ती कौमार्य चाचणी थांबविण्यात आली होती. अशी कौमार्य चाचणी त्यांच्या समाजात होत नसल्याचे जात पंचायतीच्या पंचांनी पोलीसांना लिहून दिले होते. मात्र या दाव्याला छेद देणारा व्हिडिओ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे आला आहे. हा व्हिडिओ या विवाहाशी संबधित नसला तरी अशा प्रकारची कुप्रथा चालत असल्याची ग्वाही देणारा आहे. पुणे येथील हा व्हिडिओ असल्याचे समजते.
दरम्यान त्रंबकश्वर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारी अंतर्गत एका ठरावीक लग्नामध्ये कौमार्य चाचणी केली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. गोपनीय यंत्रणा सतर्क करुन पोलीस ठाण्यातील महिला कर्मचारी आणि महिला अधिकारी यांच्यामार्फत गोपनीय माहीती काढली आहे. सदर लग्नामध्ये सुद्धा पाळत ठेवली आहे. कौमार्य चाचणीचा प्रकार घडला नसल्याचा अहवाल संबंधित पोलीस ठाण्याने दिल्याची माहिती पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली आहे. दरम्यान व्हायरल व्हिडिओ प्रकरणीही चौकशी केली जाईल असे त्यांनी सांगितले आहे.
समाजात असणाऱ्या समूहाच्या वेगवेगळ्या चालीरीती असतात, त्या चालीरीती कालानुरूप बदलल्या पाहिजे. मात्र काही समाज समूह आपल्या जातीची किंवा समूहाची ओळख म्हणून चालीरीती कितीही अन्यायकारक असल्या किंवा अवैज्ञानिक असल्या तरी त्या आपल्या समूहाचे किंवा धर्माचे वैशिष्ट्य म्हणून चालूच ठेवतात. जसे मुस्लिम समाजात दाढी ठेवणे, ब्राह्मण वर्गात शेंडी ठेवणे, शीख समाजात पगडी आणि दाढी ठेवणे. मारवाडी लोकांचा पेहराव, काही समाज पगडी आणि फेट्या वरून ओळखले जात, महिला बुरखा किंवा घुंगट. हिंदू महिला कुंकू लावणे अशा प्रथा आहेत, असे सामाजिक कार्यकर्त्या दुर्गा गुडुलू यांनी सांगितले.
मात्र याप्रथा रूढी जो पर्यंत व्यक्तीच्या विकास आणि स्वातंत्र्याच्या आड येत नाही तो पर्यंत ठीक आहे, मात्र काही रूढी परंपरा या अत्यन्त घातक आणि स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या असतात अशीच एक प्रथा कंजरभाट समाजात आहे ती म्हणजे मुलीची लग्नात कौमार्य चाचणी केली जाते. अशीच एक चाचणी नासिक मध्ये होणार असल्याची माहिती कृष्णा इंद्रेकर यानी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला दिली आणि अशी चाचणी करणे कायदयाने गुन्हा असल्याने अनिस ने यासंदर्भात पोलिसात तक्रार दिली आणि अशी चाचणी रोखावी अशी विनंती केली.
काय आहे कौमार्य चाचणी ?
कांजरभाट समाजात कौमार्य चाचणीला महत्व असून लग्न झाल्यावर पहिल्या दिवशी ही कौमार्य चाचणी, म्हणजे लग्न झालेल्या मुलींचे लग्नापूर्वी कुणासोबत शरीर संबंध आले आहेत का हे तपासणयाची चाचणी म्हणजे कौमार्य चाचणी आहे.
कशी केली जाते कौमार्य चाचणी ?
ही चाचणी करण्यासाठी एक रूम पाहिला जातो किंवा होटल मध्ये रूम बुक केला जातो. त्याठिकानी जातीचे जे पंच असतात ते, नवरदेवाकडील दोन महिला, मुलीकडील दोन महिला असतात, जे मुलीला रूम मध्ये पाठवण्या पूर्वी, तिची तपासणी करततात, तिच्या हातात किती बांगड्या आहेत ते मोजतात, बांधून ठेवतात, केसात पिन किंवा काही धारदार वस्तु नाही याची खात्री करतात आणि मग नवीन जोड़पे ज्या पलंगावर झोपणार आहेत त्या पलंगावर सफेद कपड़ा टाकला जातो आणि नवीन दांपत्यास शरीर संबंध करण्यास सांगितले जाते. शरीर संबंध नंतर सफेद कपडयावर रक्ताचा लाल डाग पडला तर, माल खरा आणि नाही पडला तर माल खोटा असा निर्णय दिला जातो.
रक्ताचा कपड़ा जात पंचायत मध्ये पंचाना दाखवला जातो. मात्र जर दाग नाही पडला तर मात्र माल खोटा ठरवून त्या मुलीला जाब विचारला जातो. तिचे आई वडील तिला मारहाण करततात, पंच तिची अवहेलना करतात. मुलीने जर सांगितले की दुसऱ्या जातितील मुलगा होता तर, त्यावेळी मुलाकडील लोकांनी ही मुलगी नको आम्हाला असे म्हटले तर तो संबंध तुटतो, किंवा आयुष्य भर त्या महिलेस माल खोटा म्हणून अवहेलना सहन करावी लागते, जर मुलीने मुलगा आपल्या जातीतला आहे सांगितले तर त्या मुलाला आणि त्यांच्या आई वडिलांना बोलावले जाते, त्या मुलाला विचारले जाते त्याने कबूल केले तर त्याच्या कुटुंबाला दंड केला जातो.
मात्र ही पद्धत अत्यंत चूकीची असून महिलेचा अपमान करणारी आहे. कारण आजकाल आधुनिक काळात मूली खेळात भाग घेतात, ट्रेकिंग करतता, सायकल , मोटर सायकल चालवतात. ट्रेन, बस धावत जाउंन पकडतात अश्या कुठल्याही प्रसंगी महिलेच्या योनी मार्गातील पडदा सहज फाटु शकतो. त्यामुळे तिची कंजरभाट समाजातील कौमार्य चाचणी ही चूकीची येऊ शकते आणि त्यात मुलीचा कोणताही दोष नसताना तिला अपमान आणि अवहेलनेस सामोरे जावे लागू शकते. किंवा डॉक्टरांच्या मदतीने एखादी मुलगी सर्जरी करून असा पडदा लाऊन घेवून आपण व्हरजीन किंवा खरा माल असल्याचा बनाव देखील करू शकते, असे डॉ. रेवत कानिंदे यांनी सांगितले.
या कुप्रथेच्या विरोधात जनजागृती आणि अश्या कृत्याचा निषेध करण्यासाठी मैक्स महाराष्ट्र ने यासंदर्भात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ ठकसेन गोराणे, तक्रारदार कृष्णा इंद्रेकर, लीलाबाई इंद्रेकर आणि विवेक तमाईचेकर यांच्याशी याबाबत संवाद साधला . यासर्वानी समाजातील प्रथेबद्दल नाराजगी व निषेध व्यक्त तर केलाच मात्र समाजात त्यांनी याला विरोध केल्यामुळे ते सध्या समाजातून बहिष्कृत असल्याचे देखील सांगितले, त्यांना समाजाच्या कुठल्याही कार्यक्रमात बोलावले जात नसून गेल्यास त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं.