Home > News Update > स्मशानभूमीवरील जीवंत माणसांच्या व्हिडीओची सत्यता काय?

स्मशानभूमीवरील जीवंत माणसांच्या व्हिडीओची सत्यता काय?

स्मशानभूमीवरील जीवंत माणसांच्या व्हिडीओची सत्यता काय?
X

भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सुरेश नखवा यांनी एक व्हिडीओ ट्विटर अकाउंटवरून शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करताना ' धक्कादायक जिवंत माणसाला मुंबई महानगरपालिकेने अंत्य़संस्कारासाठी आणलं आहे.'' असं म्हणत महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

हा व्हिडीओ सुरेश नखवा यांनी ट्वीट करताच मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरून एक रिप्लाय आला. त्यामध्ये महानगरपालिकेने सर आम्हाला सदर घटनास्थळाची माहिती द्या. तसंच तुमचाही नंबर द्या. आम्हाला हे लवकरात लवकर योग्य ती माहिती तपासून यावर कारवाई करायची आहे.

असं म्हणत सुरेश नखवा यांच्याकडून महानगरपालिकेने डिटेल्स मागितले.

मात्र, सुरेश नखवा यांनी कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळं या व्हिडीओची सत्यता समोर आलेली नाही. हा व्हिडीओ कोणाचा आहे. कुठं शूट करण्यात आला? कोणी शूट केला असे अनेक प्रश्न उपस्थित होत असताना… नखवा यांनी शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. आणि व्हायरल झालेला व्हिडीओ देशभर अनेक गृपवर शेअर करण्यात आला.

काय आहे व्हिडीओ?

नखवा यांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये काही वार्डबॉय पीपीई कीटमध्ये असून ते शववाहिनीमध्ये असलेल्या एका मृतदेहाचा चेहरा पडताळून पाहत आहेत. पडताळाताना आपण योग्य निरिक्षण करुन पाहिल्यास मृतदेहाची मान हलल्यासारखी दिसते. आणि डोळ्याची हालचाल झाल्यासारखी दिसते. हा व्हिडीओ जर आपण स्लो मोशनमध्ये पाहिला तर मृतदेहाची मान स्ट्रेचर हलल्यामुळे हलली असावी. असे दिसते. तसंच प्रकाशाच्या दिशेने मोबाईल असल्यामुळे डोळे चमकल्यासारखे दिसतात. मात्र, शववाहिनीमध्ये असलेल्या त्या व्यक्तीने केलेली हालचाल आहे की, शववाहिनीमध्ये झालेल्या हालचालीमुळे त्या व्यक्तीची हालचाल झाली. याचं सत्यापन मात्र, होऊ शकलेलं नाही. त्यामुळे सदर व्यक्ती जीवंत आहे की मृत हे समोर येत नाही. मात्र, एका गुप्ता नामक परिवाराने सदर व्यक्ती त्यांची नातेवाईक असल्याचा दावा करत शववाहिनीतील व्यक्ती जीवंत आहे. असं म्हटलं आहे. तसंच भाजपच्या आयटी सेलचे सुरेश नखवा यांनी देखील तसाच दावा केला आहे.

दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एका कुटुंबाने या व्हिडीओत दिसणारी व्यक्ती ही त्यांच्या घरातील सदस्य असल्याचा दावा केला आहे.

बिजय गुप्ता नावाच्या एका व्यक्तीने व्हिडीओत दिसत असणारी व्यक्ती त्यांचे वडील असल्याचा दावा केला असून या व्हिडीओत दिसणारी व्यक्ती ही रामशरण लोचन गुप्ता आहे. असं त्यांचं म्हणणं आहे. त्या संदर्भात त्यांनी वांद्रे पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे. रामशरण यांचा मृत्यू २९ जून २०२० ला झाल्याचं मृत्यू प्रमाणपत्रावरून दिसून येतं. बिजय गुप्ता यांना दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांचे वडील रामशरण गुप्ता हे चेंबूर आयसीयू हॉस्पिटल मध्ये अॅडमीट होते. तोपर्यंत त्यांचा अहवाल कोव्हिड पॉझिटीव्ह आला. त्यानंतर त्यांना 27 जून 2020 ला K B Bhabha hospital Bandra येथे Ambulance मध्ये हलवण्यात आले. यावेळी ते देखील Ambulance मध्ये सोबत होते. त्यानंतर २९ जूनला त्यांचे वडील गेल्याचे हॉस्पिटलने त्यांना कळवले.

त्यानंतर त्यांना त्यांच्या वडिलांचं प्रेत ही मिळालं. पण ते गुंडाळलेले असल्यामुळं ते त्यांच्या वडिलांना पाहू शकले नाही. मात्र, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी या व्हिडीओची चौकशी करण्याची विनंती पोलिसांना केली आहे.

या संदर्भात सदर व्यक्ती आपली नातेवाईक असं सांगणाऱ्या राधेशाम मिश्रा यांच्याशी मॅक्समहाराष्ट्रने बातचीत केली. त्यांच्या मते मृत व्यक्ती हे त्यांचे सासरे होते. त्यांचं वय 75 वर्षे होते. त्यांचं दुकान होतं. चेंबूर भागात असलेल्या वाडवळी गावात.. माझ्या बायकोच्या मते ही त्यांच्या वडिलांची बॉडी आहे. ही जी हालचाल आहे. त्यामध्ये दिसून येत आहे. घरातले व्यक्ती तर सांगतच आहेत. हे गुप्ताजी आहेत म्हणून आजुबाजूचे व्यक्ती देखील हे गुप्ताजी आहेत. असं सांगत आहेत.आता पुढे काय करायचं याच्यावर आम्ही विचार करत आहोत.

हे तुमचे सासरे आहेत कशावरून?

यावर ते म्हणतात, त्याचे फोटो, त्यांचे जे मुलं आहेत. मी जावई आहे. आम्ही सांगतो ते तेच आहेत. या संदर्भात आम्ही वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये एक अर्ज दाखल केला आहे. आता पोलिसांनी हा अर्ज घेतला आहे. आता या संदर्भात चेंबूर पोलिस स्टेशनला कळवून माहिती घेऊ. असं त्यांनी म्हटलं आहे.

राधेशाम मिश्रा सांगतात... या संदर्भात त्यांनी हॉस्पिटलशी बातचीत केली. तेव्हा ते म्हणाले मृत व्यक्तीची जी पॅकिंग केली आहे. ती इथली नाही. अशा पद्धतीने आम्ही पॅक करत नाही. मात्र, हॉस्पिटलवाले जरी असं सांगत असले तरी ही सदर व्यक्ती आमचीच आहे. हे ते ठामपणे मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगतात.

अतुल मिश्रा हा तरुण सांगतो. ते माझे आजोबा होते. आजुबाजूचे लोक देखील असंच बोलत आहेत. तरी पण त्यावेळेस परिस्थिती अशी होती की, बॉडी दाखवण्यात आली नाही. त्या मृत व्यक्तीचं मृत्यू प्रमाणपत्र देखील आमच्याकडे आहे. आपण डॉक्टरवर विश्वास ठेवतो. आपण त्यांना देव मानतो. त्या लोकांनी असं केलं. आपण त्यावर काही बोलू शकत नाही. परिवाराच्या वतीने आता प्रयत्न करत आहोत. ते आम्हाला भेटले पाहिजेत.

प्रदीप गोडसे मनसे उल्हासनगर शहराध्यक्ष यांनी या प्रकरणाबाबत मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितले, ते म्हणतात...

हा धक्कादायक प्रकार आहे. एक जीवंत व्यक्ती आहे. आणि त्याला मृत घोषित केलेलं आहे. आणि हा जो प्रकार घडला आहे. तो पहिल्या कोव्हिड लाटेत घडलेला आहे. त्यावेळेस त्या मृत व्यक्तीचा चेहरा देखील लोकांना दाखवत नव्हते. आणि तेव्हा लोकांना घाबरून ठेवलेलं होतं. की, चेहरा जरी दाखवला तरी विषाणू तुमच्या अंगात पसरु शकतो. स्मशानभूमीमध्ये कोणालाही प्रवेश नव्हता. त्या जून महिन्याच्या कालावधीमध्ये गेल्यावर्षी यांनी अंत्यसंस्कार केले. पूर्ण बॉडी पॅक असताना आणि त्यांना सांगितलं की, हा तुमचा पेशन्ट नातेवाईक जो हा मृत झालेला आहे. या लोकांना बॉडी न दाखवता जाळण्यात आले. सोशल माध्यमांच्या माध्यमातून व्हिडीओ पसरला गेला. त्याच्यामध्ये समजलं की, या व्यक्तीने जी बॉडी जाळली ती तर दुसरी होती. आणि जी व्यक्ती यांची आहे. ती तर जीवंत दिसते. मग हा प्रकार नक्की काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत कदाचित किडण्या विकणं इतर अवयव काढणं असतं? असला काही प्रकार आहे का? मुंबईमध्ये हा प्रकार सर्रास चालतात. हे सर्व जगाला माहिती आहे. मुंबईतील जे बांद्रा येथील हॉस्पिटल आहे भाभा... त्या ठिकाणी या व्यक्तीला अडमीट केलं होतं. तर एक संशयास्पद आहे की, भाभा हॉस्पिटलने नक्की केलं काय? भाभा हॉस्पिटलने सदर व्यक्ती मृत नसताना दुसरीकडे पाठवला का? त्यांचे अवयव काढण्यासाठी हे सर्व केलं का? या सर्व प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी याची उच्चस्तरीय चौकशी व्हायला पाहिजे. अशी मागणी या निमित्ताने करत आहोत. तसंच या संदर्भात आम्ही स्थानिक आमदारांशी देखील बोललो असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापर्यंत आम्ही हा विषय नेणार आहोत.

आम्ही स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याशी आम्ही बातचीत केली.

हा व्हिडिओ फेक असून मुंबई महानगरपालिका सुरेश यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचं सांगितलं. सुरेश हे भाजपचे आयटी सेलचे प्रमुख आहेत. असं त्यांचं म्हणणं होतं. या व्हिडिओचा आणि मुंबई महानगरपालिकेचा काहीही संबंध नाही. असा खुलासाही यशवंत जाधव यांनी बोलताना केला.

दरम्यान मुंबई महानगरपालिकेने व्हायरल झालेल्या व्हिडीओ संदर्भात गुन्हा दाखल केला असून या व्हिडीओने समाजातमध्ये अधिक तणाव निर्माण झाला असल्याचं म्हटलं आहे.

Updated : 22 April 2021 9:21 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top