विनायक मेटेंना अपघातानंतर २ तास मदत नाही, मराठा क्रांती मोर्चाचा आरोप
X
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघातामागे घातपात आहे, असा संशय मराठा क्रांती मोर्चाने व्यक्त केला आहे. पुण्यात मराठा आरक्षणासंदर्भात मराठा संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विनायक मेटे निघाले असताना रस्त्यात अपघात झाला. त्यामुळे या अपघातामागे घातपात आहे असा संशय मराठा क्रांती मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच सरकारला जर मेटे यांना आदरांजली वाहायची असेल तर तातडीने मराठा समाजाचा ओबीसींमध्ये समावेश करावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
मराठा आऱक्षणासाठी आतापर्यंत ४२ बळी गेले आहेत, त्यात विनायक मेटे यांच्या रुपाने ४३ वा बळी गेला आहे, असा आरोपही यावेळी करण्यात आला. मराठा समाजाने आतापर्यंत शांततेच्या मार्गाने आपली मागणी ठेवली आहे, असे सांगत मेटे यांच्या अपघाताची चौकशी झालीच पाहिजे, मराठा आरक्षणाच्या बैठकीला निघालेल्या मेटेंच्या गाडीला अपघात होतो, त्यांना दोन तास मदत मिळत नाही यामागे कारण काय याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सकाळीच या प्रकरणात चौकशी करण्याची तयारी दाखवली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील असा संशय व्यक्त होत असेल तर सरकारने चौकशी करुन सत्य बाहेर आणले पाहिजे अशी भूमिका व्यक्त केली आहे.