पुलाच्या मागणीसाठी रस्त्यावर ग्रामस्थांचं कीर्तन, गावकऱ्यांचं अनोखं आंदोलन
सर्वसामान्यांच्या न्याय मागण्यासाठी आंदोलनं मोर्चे करणं ठीक परंतु सांगली जिल्ह्यामध्ये नव्या पुलाच्या मागण्यासाठी ग्रामस्थांनी फुलावरच कीर्तन करून पूल न झाल्यास येत्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची ग्रामस्थांची घोषणा केली आहे.वाचा या नागरिकांची व्यथा मांडणारा मॅक्स महाराष्ट्रचा विशेष रिपोर्ट....
X
सांगली जिल्ह्यातील मृत्यूचा पुल म्हणून प्रसिद्ध असलेला सांगली जिल्ह्यातील कमळापुर आणि रामापुर या दोन गावांना जोडणाऱ्या पुलाच्या जागी नवा पुल व्हावा म्हणून अनेक वर्षापासून नागरिक संघर्ष करत आहेत. दरवर्षी होणाऱ्या मृत्यूंची संख्या आता चाळीसच्या वर पोहचली आहे. नव्या पुलाच्या मागणीसाठी नागरिकांनी आंदोलने केली, रक्तदान केले. तरीही प्रशासन ढिम्मच आहे. बहिऱ्या प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना या समस्येचा आवाज पोहचावा म्हणून या नागरिकांनी पुलावरच कीर्तन आयोजित केले आहे.
अक्षय कृष्णात जाधव. सांगली जिल्ह्यातील खानापूर आणि कडेगांव तालुक्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या रामापुर आणि कमळापुर येथील येरळा नदीच्या याच पाणी वाहणाऱ्या पुलावरून निघाला होता. पाण्याच्या प्रवाहात पडून पाईपमधून वाहून जाताना त्यातील तुटलेल्या सळईमध्ये अडकला. लोकांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. त्याला बाहेर काढेपर्यंत त्या कोवळ्या जिवाने तडफडून प्राण सोडला होता.
केवळ अक्षयच नाही अशा किमान चाळीस जीवांचा बळी या पुलावर गेला आहे. आपले प्रियजन वाहून गेल्यानंतर फोडलेला हंबरडा आणि आर्त किंकाळ्यानी रामापुर आणि कमळापुरचा येरळाकाठ प्रत्येक पावसाळ्यात हादरून जातो. पण हा टाहो या किंकाळ्या ना प्रशासनाच्या कानावर पडतात ना इथल्या आमदारांच्या. गेल्या अनेक वर्षापासून लोक नव्या पुलाची मागणी करत आहेत. परंतु लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प आहेत. तर प्रशासन कागदी घोडे नाचवत आहेत. कधी तुटलेल्या पुलाची डागडुजी केली जाते. पण पाणी आल्यानंतर पुन्हा तो पुल तुटून आहे तीच परिस्थिती निर्माण होते. मग दरवर्षी बळी जाणाऱ्या जीवांचा मारेकरी हा पूल आहे की या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणारे नेते आणि प्रशासन आहे असा संतप्त सवाल आता या परिसरातील जनता विचारू लागली आहे.
सांगली जिल्ह्यातील खानापूर आणि कडेगांव या तालुक्यांच्या सीमेवर कमळापुर आणि रामापुर अशी दोन गावे आहेत. या गावांच्या दरम्यान असलेल्या येरळा नदीवरील पुलावरून दरवर्षी पाणी वाहत असते. या दोन्ही गावांचा एकमेकांशी संपर्क तुटतो. आजपर्यंत अनेक नागरिक या पुलावरून वाहून गेले आहेत. काहींचे मृतदेह देखील अंत्यविधीकरीता सापडले नाहीत. दरवर्षी पावसाळ्यात कुणी वाहून गेल्याचा टाहो, कुणी लहान मुलगा वाहून गेल्याने आईने फोडलेला हंबरडा या येरळाकाठ परिसरात दरवर्षी ऐकायला मिळतो. परंतु लोकांचा हा आक्रोश, आर्त किंकाळ्या या भागातील राज्यकर्त्यांच्या कानापर्यंत पोहचत नाहीत.
रामापुर या गावातील लोकांची कमळापुर येथे शेती आहे. तर कमळापुर हे गाव छोटे असल्याने येथील विद्यार्थी शिक्षणासाठी तसेच इतर सर्व गरजांसाठी रामापुर या गावावर अवलंबून असतात. या दोन गावामधून पुढे इस्लामपूरकडे जाणारा रस्ता आहे . पावसाळा सुरू झाला की या नदीच्या पुलावर पाणी येते. यावेळी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. शेतकरी आपल्या शेतात जाऊ शकत नाहीत.जनावरांना चारा आणू शकत नाहीत. या मार्गावरची वाहतूक ठप्प असते. या पुलावरील पाण्यातून जाणाऱ्या अनेक नागरिकांनी आपला प्राण गमावला आहे.
लोकशाही मार्गाने अनेकदा या ग्रामस्थानी आपल्या मागण्या स्थानिक आमदार, खासदार तसेच प्रशासनासमोर मांडल्या तरीही अनेक दशकापासून संघर्ष करत असलेल्या या नागरिकांना अद्याप न्याय मिळाला नाही. लोकांनी गेल्यावर्षी सरकारचा प्रशासनाचा निषेध म्हणून रक्तदान आंदोलन केले. तरीही प्रशासन हलले नाही.
बहिऱ्या लोकाप्रतीनिधीना तसेच प्रशासनाला जागे करण्यासाठी नागरिकांनी आता नवीन पुल संघर्ष समितीच्या माध्यमातून आज या पुलावरच कीर्तन आणि व्याख्यानाचे आयोजन केले. कीर्तनकार ऋषिकेश खारगे, व्याख्याते ज्ञानेश्वर कोळी आणि सुप्रसिद्ध कथा कथानकार प्रा विश्वनाथ गायकवाड या वक्त्यांनी या पुलावरच बांधण्यात आलेल्या मंडपात कीर्तन तसेच व्याख्यान केले.
गावकऱ्यांच्या गर्दीमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
यावेळी बोलताना प्रा विश्वनाथ गायकवाड सांगतात " या नदीच्या काठावर राहणाऱ्या दोन गावांचा आवाज ऐकायला लोकप्रतिनिधी तयारच नाहीत. अनेक वर्षे आम्ही आमची समस्या शासन दरबारी पोहचवत आहोत. पण लोकप्रतिनिधी ऐकत नाहीत. आता आम्ही ग्रामस्थानी मिळून जोपर्यंत हा पूल बांधला जात नाही तोपर्यंत येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे.
सामाजिक कार्यकर्ते तसेच रणसंग्राम फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक लाड यांनी जोपर्यंत हा पूल होत नाही तोपर्यंत आंदोलनाच्या माध्यमातून निकराची लढाई लढणार असल्याचे सांगितले.
रामापुर आणि कमळापुर हि दोन गावापासून काही मिनिटांच्या अंतरावर कृषिराज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार अनिल बाबर राहतात. जिल्ह्याचे खासदार संजय पाटील यांचे तासगाव देखील जवळच आहे. असे असताना लोकांची पुलाची ज्वलंत समस्या सुटत नाही.
या संदर्भात मॅक्स महाराष्ट्रने बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंते जी.एस. नाईक यांना प्रत्यक्ष भेटून याबाबत विचारणा केली असता आम्ही सदर पुलाचे प्रस्ताव आम्ही वारंवार पाठवत आहोत. पण त्याची मंजुरी येत नाही. आताही आम्ही या पुलाचे प्रस्ताव पाठवले आहेत. आम्ही लवकरच ग्रामस्थांचा पुलाचा प्रश्न मार्गी लावनार असल्याचे सांगितले.
संघर्ष समितीचे कार्यकर्ते या पुलावरच उपोषणाला बसलेले आहेत. त्यांचा आवाज या भागातील आमदार खासदार तसेच प्रशासन यांच्यापर्यंत आता तरी पोहचणार का ? अद्याप लोकप्रतिनिधींनी आंदोलनकर्त्यांनी भेट घेतलेली नाही. नव्या पुलाचा प्रश्न निकालात काढण्यासाठी अजून किती नागरिकांना या पुलावरून वाहून जावे लागणार हा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
लोकशाही व्यवस्थेत जनता सार्वभौम असते. पण प्रत्यक्षात इथल्या जनतेच्या प्रश्नाकडे या लोकप्रतिनिधींनी ढुंकूनही बघितलेले नाही. परंतु नागरिक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे.या असंतोषातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. थंडीत ठिय्या आंदोलन सुरू केल्याने या आंदोलकांच्या जिविताचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
लोकप्रतिनिधींनी आंदोलकांची भेट घेऊन या नव्या पुलाच्या निर्मितीत ठोस पावले उचलून येथे होणारे मृत्यू रोखावेत अन्यथा इथून पुढे होणारे मृत्यू हे मृत्यू नसून पुलाच्या निर्मितीत हलगर्जीपणा करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने निष्पाप नागरिकांचे खून ठरतील.