पाणी प्रश्न तापला, तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवर नागरिकांचा रस्ता रोको
अजून मे महिना सुरु व्हायचा आहे त्याअगोदरच पाण्यासाठी गावकरी त्रस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. तेलंगणा-महाराष्ट्र मार्गावर चक्क गावकऱ्यांनी एक तास चक्काजाम आंदोलन करुन वाहतूक ठप्प करुन ठेवली.
X
महाराष्ट्र तेलंगणाच्या सीमेवर असलेले गावकरी पिण्याच्या पाण्यासाठी आज आक्रमक झालेले पाहायला मिळाले. गेल्या चार दिवसापासून पाच गावातील नळांना कोरड पडली असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र याकडे प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे सीमेवरील गावकऱ्यांनी आंदोलन करत तेलंगणा-महाराष्ट्र महामार्ग एक तास रोखून धरला. सीमावर्ती भागातील काही गावांना नैसर्गिक पाण्याचे स्रोत नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांना नाल्यातील गढूळ पाण्याने आपली तहान भागवावी लागत आहे.गढूळ पाणीसुद्धा गावकऱ्यांना फार लांबून पायपीट करुन आणावे लागते, असे गावकरी सांगत आहेत. याला वैतागलेल्या गावकऱ्यांनी महाराष्ट्र- तेलंगणाला जोडणाऱ्या सकमूर मार्गावर ठिय्या आंदोलन केले.
महाराष्ट्र-तेलंगणा मार्गावरील वाहतूक एक तास ठप्प झाली होती. गोंडपिंपरी तालुक्यात येणाऱ्या हेटी नांदगाव-चेकबापूर पाणी पुरवठा योजना चार दिवसांपासुन ठप्प आहे. त्यामुळे हेटी, नांदगाव, सकमुर, गुजरी, चेकनंदगाव, कुडेनांदगाव, टोलेनांदगाव या गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे ही योजना ठप्प झाल्याच्या आरोप करीत गावकऱ्यांनी ग्रामपंचायतेच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी केली. मात्र यामध्ये प्रशासनाने लक्ष घालून हा प्रश्न लवकरता लवकर सोडवला पाहिजे आणि गावकऱ्यांची तहान भागवली पाहिजे. अजून उन्हाळ्याचे दिवस सुरु होणे बाकी आहे त्याअगोदरच पाण्यासाठी सीमावर्ती भागातील गावांना वणवण करावी लागत आहे. हे महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील गावाकऱ्यांचे खरे दु:ख आहे. याकडे राज्य सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे.