Home > News Update > पोलिसांचा सरावासाठी गोळीबार, गावकऱ्यांच्या जीवाला घोर

पोलिसांचा सरावासाठी गोळीबार, गावकऱ्यांच्या जीवाला घोर

गुन्हेगारांना रोखण्यासाठी पोलिसांना शस्त्र प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. पण याच शस्त्र प्रशिक्षणाची दहशत सध्या रायग़ जिल्ह्यातील एका गावातील लोकांमध्ये निर्माण झाली आहे. काय आहे हा प्रकार पाहा आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा ग्राऊंड रिपोर्ट....

पोलिसांचा सरावासाठी गोळीबार, गावकऱ्यांच्या जीवाला घोर
X

रायगड: रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील परहूर पाडा इथल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रावर सुरू असलेल्या सरावादरम्यान बंदुकीतून सुटलेली गोळी थेट घराच्या परसात असणाऱ्या सिंटेक्सच्या पाण्याच्या टाकीत घुसली. त्याचवेळी बाजूला उभ्या असणाऱ्या सहा वर्षांच्या मुलाच्या अगदी जवळून बंदुकीची गोळी गेल्याने तो थोडक्यात बचावला आहे. त्यामुळे गावकरी भीतीच्या सावटाखाली आहेत. यासंदर्भात ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यावर ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली. पहूरपाडा इतळ्या कार्ले गावामध्ये अशा थरारक घटना घडण्यास सुरुवात झाल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. पोलिस प्रशासनाने तातडीने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन सराव मैदान आणि गावामध्ये मोठी संरक्षक भिंत उभारून अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी , अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे . दरम्यान, पोलिसांनी लवकरच उपाययोजना करुन अशा घटना टाळण्यासाठी प्रयत्न सुरु करण्याचे आश्वासन दिले आहे.

पोलिसांना अचूक निशाणा साधण्यासाठी सरावाची गरज असल्याने परहूर पाडा येथे पोलीस सराव मैदान उभारण्यात आले. सध्या याच सराव मैदानावर पोलिस गोळीबार करण्याचा सराव करतात. सराव मैदानाच्या बाजूला डोंगर आहे आणि डोंगराच्या पलीकडे कार्ले गाव आहे. या गावामध्ये सुमारे सव्वादोनशे घरे आहेत. पोलिसांचा गोळीबार करण्याचा सराव सुरू असताना बंदुकीतून झाडलेल्या गोळ्या कार्ले गावातील प्रवीण पाटील यांच्या घरातील परसात असलेल्या पाण्याच्या टाकीतून आत घुसली. बंदुकीतून सुटलेली गोळी पाटील यांचा सहा वर्षीय मुलगा आद्य याच्या अगदी जवळून गेली . सुदैवाने तो थोडक्यात बचावला .

काही गोळ्या या डोंगरातील दगडांवर आपटून गावात घुसल्या आहेत. त्यामुळे गावामध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसांपूर्वी गावातील अन्य ठिकाणीही गोळ्या सापडल्याने गावातील लोक एकत्र जमा झाले. त्यांनी तातडीने घटना अलियाग पोलिसांना कळवली . ताबडतोब अलिबाग पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांनी परिसराची पाहणी करून परहूरपाडा येथील प्रशिक्षण केंद्राला भेट दिली. तसे बंदुकीची गोळीही ताब्यात घेतली. दोन वर्षांपूर्वी असा प्रकार सातत्याने घडत होता. ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिल्यावर हा प्रकार बंद झाला होता. मात्र पुन्हा अशा घटना घडू लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान आमदार जयंत पाटील यांनीही यासंदर्भात रायगडच्या पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून हे सराव केंद्र इतरत्र हलवण्याची मागणी केली आहे. या भागात लोकवस्ती वाढत असल्याने यापुढे अशी घटना घडू नये यासाठी हे सराव केंद्र इतरत्र हलवण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे.


Updated : 2 Feb 2021 5:32 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top