विक्रम गोखले आणि कंगना रणावतवर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे - रविकांत तुपकर
X
बुलडाणा // विक्रम गोखलेंसारख्या अतिशय जेष्ठ अभिनेत्यांने कंगना रणावतच्या वक्तव्याचं समर्थन करणे योग्य नाही. इंग्रजांना या देशातून घालवायला अनेकांनी बलिदान दिले. अनेकांनी त्याग केला आणि याच त्यागाच्या- बलिदानाच्या जोरावर स्वातंत्र्य मिळाले आहे. विक्रम गोखले आणि कंगना रणावतवर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे त्यांनी एकदा मेंटल हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी करायला हवी असा घणाघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे.
2014 ला स्वातंत्र्य मिळालं म्हणतात, मग आता उद्या जर का मोदी सरकार आलं नाही तर देश काय पुन्हा पारतंत्र्यात जाणार आहे का? असं तुपकर म्हणाले.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी क्रांतिकारकांनी काय सोसलय,काय भोगलय याची यांना जाणीव नाही. विक्रम गोखले यांच्यासारख्या जेष्ठ अभिनेत्याला हे बोलणं शोभत नाही. विक्रम गोखलेंवर गुन्हा दाखल झाला पाहीजे आणि त्यांची देशातून हकालपट्टी झाली पाहीजे अशी आमची मागणी आहे असं तुपकर म्हणाले.
तसेच पुढे बोलतांना ते म्हणाले की, या संदर्भात आम्हीही तक्रार करू आणि ठिकठिकाणी कार्यकर्त्यांना आंदोलनं करायला लावू. देशाचा अपमान,आमच्या क्रांतिकारकांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. सोबतच त्यांनी हे वक्तव्य दुपारी- सकाळी केलं की रात्री केलं हे तपासले पाहीजे असा टोला रविकांत तुपकर यांनी लगावला