माहिती अधिकारात माहिती न मिळाल्याने वर्डी ग्रामस्थांचे आमरण उपोषण
X
चोपडा तालुक्यातील वर्डी येथील दत्तात्रय पाटील व महिंद्र रतिलाल पाटील यांनी 29 जुलै पासून माहितीचा अधिकारात 14 व्या वित्त आयोगातून झालेल्या कामाची माहिती मागितली होती. परंतु ती माहिती आजपर्यंत न मिळाल्याने तसे अपील व सुनवणीही झाले असून या सर्व बाबींना केराची टोपली दाखविण्यात आली असल्याचे म्हणत सदर माहिती मिळावी यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पालकमंत्र्यांना निवेदन देऊन देखील चौकशी न झाल्याने त्यांनी चोपडा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
दरम्यान यासंदर्भात गट विकास अधिकारी भरत कोसोदे यांना विचारणा केली असता त्यांनी माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीनुसार व त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या समक्ष कामाची पाहणी करून चौकशी करण्यात आली आहे. तसेच चौकशीचा रिपोर्ट वरिष्ठांकडे पाठविण्यात आलेला आहे. तक्रारदारांनी चौकशीचा अहवाल मागितला नसल्या कारणाने त्यांना चौकशीच्या अहवाल देण्यात आलेला नाही, त्यांनी जर चौकशी अहवाल मागितला तर आम्ही चौकशी अहवाल देण्यास तयार असल्याचे यावेळी सांगितले.