Home > News Update > मंत्री शंकरराव गडाख यांच्याविरोधात वंचित बहुजन आघाडी करणार रास्तारोको

मंत्री शंकरराव गडाख यांच्याविरोधात वंचित बहुजन आघाडी करणार रास्तारोको

मंत्री शंकरराव गडाख यांच्याविरोधात वंचित बहुजन आघाडी करणार रास्तारोको
X

अहमदनगर : वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे 2019 चे उमेदवार संजय लक्ष्‍मण सुखदान यांच्यावर राजकीय द्वेषातून शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख हे अन्याय करत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे. संजय सुखदान यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न, त्यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांसह शक्तिप्रदर्शन करणे, त्यांची पत्नी ज्या प्रभागाच्या नगरसेविका आहेत त्या प्रभागात कार्यकर्त्यांकरवी तोडतोफ घडवून आणणे असे आरोप पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

संजय सुखदान हे वेळोवेळी बहुजन समाजावर होणाऱ्या अन्याय , अत्याचाराविरोधात आवाज उठवत असतात, सत्ताधारी मंत्री म्हणून त्यांनी अनेकवेळा मंत्री शंकरराव गडाख यांच्याविरोधात देखील आंदोलने - मोर्चे केले आहेत. एक प्रबळ विरोधक म्हणून संजय सुखदान काम करत असल्याने राजकिय द्वेषातून ते आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप सुखदान यांनी केला आहे. सोबतच मंत्री शंकराव गडाख हे सत्तेचा गैरवापर करून आमच्या कुटुंबावर दडपण आणत असल्याचा आरोप करत संजय सुखदान यांनी कुटुंबासमवेत आत्महत्या करण्याचे जाहीर केले होते, एका राजकीय पक्षाच्या नेत्यावर जर आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर सर्वसामान्य जनतेची मंत्री यांच्या नजरेत काय किंमत असेल? याची कल्पना न केलेलीच बरी असं सुखदान यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. दरम्यान याबाबत आपन वेळोवेळी पोलीस प्रशासनाकडे तक्रार करण्याचा प्रयत्न केला मात्र आपली तक्रार घेण्यास पोलीस नकार देत असल्याचे सुखदान यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मंत्री शंकरराव गडाख यांच्यावर कारवाई होत नसल्याने 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर येथे वंचित बहुजन आघाडीच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे, संजय सुखदान, योगेश साठे, सुरेश कोडेलकर, मनोज साळवे,जीवन पारधे, यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Updated : 28 Oct 2021 4:17 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top