कोव्हिडमुळे योगी सरकारमधील 3 मंत्र्यांचे आणि 5 आमदारांचं निधन
X
उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री आणि भाजपचे आमदार विजय कश्यप यांचे गुरुवारी गुडगाव येथील रूग्णालयात कोरोनाने निधन झाले. विजय कश्यप हे भाजपचे पाचवे आमदार आणि उत्तर प्रदेशमधील योगी सरकारच्या मंत्रीमंडळातील तिसरे मंत्री आहेत. ज्यांचं कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले आहे.
या अगोदर बुधवारी राजस्थानमधील भाजपचे आमदार गौतम लाल मीना यांचेही कोरोनाने निधन झाले होते.
आमदार कश्यप हे उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगरमधील मुर्थावळ विधानसभा मतदार संघाचे आमदार होते. त्याचं वय 56 वर्ष होते. कोरोनाने दगावलेले भाजपचे ते पाचवे आमदार आहेत. कश्यप यांनी गुडगावच्या मेदांता रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारमध्ये महसूल व पूर नियंत्रण मंत्री होते.
कश्यप हे उत्तर प्रदेश सरकारचे तिसरे मंत्री आहेत. ज्यांचं कोरोनाच्या संक्रमणाने निधन झालं आहे. गेल्या वर्षी उत्तर प्रदेश सरकारचे दोन मंत्री चेतन चौहान आणि कमल राणी वरूण यांचं कोरोनाने निधन झालं होतं. कमल राणी वरूण या कानपूर मधील घाटमपुर येथील आमदार होत्या. योगी सरकारच्या मंत्रिमंडळात देखील त्या मंत्री होत्या. चेतन चौहान हे सुद्धा योगी सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्री होते.
याअगोदर ७ मे रोजी उत्तर प्रदेशमधील रायबरेलीच्या सलोन मधील भाजपचे आमदार दल बहादुर कोरी यांचे कोरोना संसर्गामुळे लखनौच्या एका खासगी रुग्णालयात निधन झाले होते.
२८ एप्रिल रोजी राज्यातील बरेली जिल्ह्यातील नवाबगंज विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार केसरसिंग गंगवार यांचे सुद्धा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निधन झाले. ते 64 वर्षांचे होते.
गंगवार हे २००९ मध्ये बसपा मधून विधानपरिषदेवर निवडून आले होते आणि २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपमध्ये दाखल झाले. पक्षाने त्यांना नवाबगंजमधून तिकीट दिले होते, त्यांनी या ठिकाणी विजय मिळवला होता.
तत्पूर्वी, भाजपच्या लखनऊ पश्चिम मतदारसंघातील 76 वर्षीय आमदार सुरेशकुमार श्रीवास्तव यांचे 23 एप्रिलच्या संध्याकाळी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निधन झाले. त्यांची पत्नी मालती श्रीवास्तव यांनादेखील कोरोनाचा संसर्ग झाला असता, दोन दिवसांनंतर 24 एप्रिल रोजी लखनऊच्या संजय गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (पीजीआय) मध्ये त्यांचे सुद्धा निधन झाले होते.
२३ एप्रिलच्या सकाळी उत्तर प्रदेशमधील औरैया जिल्ह्यातील सदर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे 56 वर्षीय आमदार रमेशचंद्र दिवाकर यांचं ही कोरोनाच्या संक्रमणाने निधन झालं होतं. त्यांच्या या निधनानंतर दुसर्या दिवशीच म्हणजे २४ एप्रिलला त्याचे 92 वर्षीय वडील रामदत्त दिवाकर यांचे सुद्धा दीर्घ आजाराने निधन झाले होते.