मुख्यमंत्र्याच्या घराबाहेरील महिला पोलिस कॉन्स्टेबलवर जीवघेणा हल्ला, आरोपी फरार
X
महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सामान्य महिलांवर होणारे अत्याचार वाढत असताना आता महिला पोलिस कॉन्स्टेबलची छेडछाड करून तिच्यावर हल्ला करण्यात आला. योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढताना दिसत असून मुख्यमंत्री योगी बघ्याची भूमिका घेतायत की काय? असा प्रश्न पडू लागला आहे.
काय आहे प्रकरण?
उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊ मध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानापासून १० मिनिटांच्या अंतरावर महिला कॉन्स्टेबलला मारहाण करण्यात आली. सदर कॉन्स्टेबल अलीगंज पोलिसस्टेशनमध्ये कार्यरत आहे.
सदर महिला कॉन्स्टेबल तिच्यावर होणाऱ्या छेडछाडीला विरोध करत होती. त्या दरम्यान हल्लेखोर तरुणाने तिला लाठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत महिलेला डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असून तिची प्रकृती स्थिर आहे. परंतु या घटनेनंतर महिला सशक्तिकरणात पोलिसांच्या वर्दीपुढेही आता आव्हानं उभं राहू लागली.
मिळालेल्या माहितीनुसार, गाडीची धडक झाल्यामुळे महिला कॉन्स्टेबलला या तरुणाला विचारणा केली. त्यानंतर रागात तरुणाने महिला कॉन्स्टेबलला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. मारहाणीनंतर आरोपी फरार झाला आहे. दरम्यान अलीजंग पोलिसांनी आरोपीवर जीवघेणा हल्ला आणि छेडछाड (कलम ३७०) करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेनंतर सामान्य महिलांसह, महिला पोलिसही असुरक्षित असल्याचं चित्र पाहायला मिळतेय.