…अखेर कोरोना मातेचं 'ते' मंदिर पाडलं!
X
आपल्या देशातील लोक कोणाला देव करतील सांगता येत नाही. देशात कोरोनाने लोक मरत असताना उत्तर प्रदेशमधील प्रतापगढ जिल्ह्यातील जूहीमधील शुकुलपुर गांवामध्ये कोरोना मातेचं मंदिर तयार करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे या ठिकाणी 4 ते 5 दिवसांपासून पूजा देखील सुरु होती.
अखेर अंधश्रद्धेने भरलेल्या या कोरोना मातेच्या मंदिराला प्रशासनाने बुलडोजरने जमिनदोस्त केलं. प्रशासनाला या संदर्भात तक्रार आली होती. त्या तक्रारीनंतर शुक्रवारी 11 जूनला रात्री मंदिरात मांडलेल्या प्रतिमेसह हे मंदिर पाडण्यात आलं आहे. आणि मंदिर तयार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली.
गावात शिक्षणाचा अभाव असल्याने गावातील इतर लोक देखील या मंदिराची पूजा करत होते. गावाबरोबरच शेजारच्या गावातील लोक देखील अगरबत्ती, प्रसाद ठेवून या मंदिरात पूजा करु लागले होते. गावातील लोकांच्या मते देवीची पूजा केल्यानं कोरोनाचं संक्रमण होणार नाही.
हे सर्व प्रकरण दोन भावाच्या वादातून समोर आलं. लोकेश आणि नागेश या दोन भावांमध्ये जमीनीवरुन वाद होता. लोकेशने जमीनीचं वाटप झालं नसताना जमिनीवर मंदीर बांधल्याचं नागेशने म्हटलं होतं. तसंच या सर्व प्रकरणात अंधश्रद्धा वाढत असल्याचं देखील त्याने आपल्या तक्रारीत म्हटलं होतं. पोलिसात दाखल झालेल्या या तक्रारीनंतर पोलिसांनी हे मंदीर पाडलं आहे. पोलिसांनी तक्रार आल्यामुळं आम्ही हे मंदीर पाडत असल्याचं म्हटलं आहे.