अविवाहित भारतीय मुली केवळ मनोरंजनासाठी शारीरिक संबंध ठेवत नाहीत: मध्य प्रदेश उच्च न्यायालय...
X
मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने बलात्काराच्या आरोपींची जामीन याचिका फेटाळली आहे. ही याचिका फेटाळताना भारत हा एक रुढीवादी समाज असलेला देश आहे. भारत अजून सभ्यतेच्या त्या टप्प्यावर पोहोचलेला नाही. जिथे अविवाहित मुली धर्माची पर्वा न करता, केवळ मनोरंजनासाठी पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवतील.
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, उच्च न्यायालयाच्या इंदोर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुबोध अभ्यंकर हे एका व्यक्तीच्या जामीन अर्जावर सुनावणी करत होते. ज्यात त्या व्यक्तीने लग्नाची हमी देत एका महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान या प्रकरणात तो व्यक्ती 4 जून पासून तुरुंगवास भोगत आहे.
या प्रकरणात, आयपीसी कलम 376 (बलात्कार), 366 (अपहरण, आणि तिला लग्न करण्यास भाग पाडणे) तसेच लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण, पॉक्सोच्या विविध तरतुदींनुसार उज्जैन जिल्ह्यातील महाकाल पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान ही केस जामिनासाठी वैध नसल्याचं सांगताना "भारत एक रुढीवादी समाज असलेला देश आहे. तो अद्याप सभ्यतेच्या त्या पातळीवर पोहोचलेला नाही जिथे अविवाहित मुली, धर्माची पर्वा न करता, केवळ आनंदासाठी पुरुषांशी शारीरिक संबंध ठेवतील. आपल्या समाजात मुलीं तोपर्यंत मुलाशी शारीरिक संबंध ठेवत नाही जोपर्यंत तो तिला लग्नाचं आश्वासन देत नाही."
या प्रकरणात महिलेने 2 जून ला फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दरम्यान न्यायालयाने मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला, यावरून हे समजतं की, ती त्यांच्या नात्याबद्दल गंभीर होती आणि असे म्हणता येणार नाही की ती या नात्यात फक्त मनोरंजनासाठी होती. त्यामुळे अशा परिस्थितीत न्यायालय जामीन अर्जाला परवानगी देऊ शकत नाही.
"जर एखाद्या मुलीचे मुलाशी शारीरिक संबंध असतील तर तिला पुढे काय होईल याची जाणीव झाली पाहिजे तसेच तिने तिच्या कृत्याचे परिणाम भोगायला तयार असले पाहिजे कारण ती मुलगी आहे." जी नेहमी जोखमीच्या पातळीवर उभी असते. कारण नातेसंबंधामुळे ती गर्भवती होण्याचा धोका असतो तसेच नातेसंबंध उघड झाल्यास, तिला समाजातील निंदेचा देखील फटका बसतो.
असं न्यायालयाने म्हटलं आहे.