मुकेश अंबानी, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र यांच्या घरी बाँबस्फोट करण्याच्या धमकीचा नागपूर पोलिसांना फोन
मुंबईतील प्रसिध्द लोकांचे घर बाँबस्फोटाने उडवून देण्याची धमकीचा फोन नागपूर पोलिसांना आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
X
दोनच दिवसांपुर्वी डेंजरस मॅन (Dengerous Man) नावाने NIA ला संदेश पाठवण्यात आला होता. त्यानंतर मुंबईवर दहशतवादी (Attack on Mumbai) हल्ल्याचे सावट शक्यता असल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांना अज्ञात व्यक्तीने फोन करून मुंबईतील प्रसिध्द लोकांची घरं बाँबस्फोटाने उडवून देण्याची धमकी देणारा कॉल आला. त्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
बुधवारी नागपूर पोलीस नियंत्रण (Nagpur Police control Room) कक्षाच्या ११२ क्रमांकावर दोन कॉल आले. यामध्ये एका अज्ञात व्यक्तीने मुंबईतील प्रसिद्ध लोकांच्या घरी बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली. त्यामध्ये देशातील मोठे उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या अँटेलियाबरोबरच, बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन (Actor Amitabh Bachchan) आणि बॉलीवूड अभिनेता धर्मेंद्र (Actor Dharmendra) यांच्या घरी स्फोट करण्याची धमकी दिली आहे.
त्यामुळे हा कॉल आल्यानंतर नागपूर पोलीस नियंत्रण कक्षाकडून याची माहिती मुंबई पोलिसांनी देण्यात आली. मुंबई पोलीस कॉलरचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. नागपूर पोलीस आयुक्तांनी सांगितले की, 112 नंबरचे दोन कंट्रोल रूम असून एक मुंबईत आणि दुसरा नागपुरात आहे. त्यामुळे मुंबईहून 112 क्रमांकावर आलेले दोन्ही कॉल नागपुरात आले. या धमकीच्या कॉलची संपूर्ण माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे, अशी माहिती नागपूर पोलिस नियंत्रण कक्षाने दिली आहे.