Home > News Update > मनविसेने भरविले अहमदनगर मनपामध्ये खड्ड्यांच्या फोटोचे प्रदर्शन

मनविसेने भरविले अहमदनगर मनपामध्ये खड्ड्यांच्या फोटोचे प्रदर्शन

मनविसेने भरविले अहमदनगर मनपामध्ये खड्ड्यांच्या फोटोचे प्रदर्शन
X

अहमदनगर// महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या हटके आंदोलनासाठी नेहमीच चर्चेत असते.अशाच पध्दतीने अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने अहमदनगर महापालिकेत अनोखे आंदोलन करण्यात आले. मनविसेच्यावतीने अहमदनगर महापालिकेत शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याचे फोटो प्रदर्शन भरविण्यात आले. यावेळी तब्बल 1800 फोटो काढले संपुर्ण नगर शहरातील नागरिकांनी मनसेला पाठवले असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित संतोष वर्मा यांनी दिली.

दरम्यान यावेळी बोलताना संतोष वर्मा म्हणाले की, महानगरपालिकेचे पदाधिकारी , प्रशासन हे फक्त पगार घेण्यासाठीच महानगरपालिकेत येतात की काय अशी शंका आणि चर्चा नगरकरांच्या मनात आहे.



आयुक्त ,उपायुक्त ,महापौर-उपमहापौर, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, नगरसेवक ,सभापती हे सर्व महानगरपालिका क्षेत्रामध्ये वावरत असतात पण ज्या अडचणी जनतेला भेडसावतात त्या अडचणीबाबत सर्वजण डोळेझाक का करत असावेत हा मोठा प्रश्न. ज्या प्रकारे सरकार सांगते मी जबाबदार किंवा माझं कुटुंब माझी जबाबदारी अशाच प्रकारे हे महानगरपालिका प्रशासन नगरसेवक पदाधिकारी असं का सांगत नसावेत की "माझी महानगरपालिका माझी जबाबदारी ", " माझा मतदार संघ माझी जबाबदारी" , "माझे नागरिक माझी जबाबदारी ". या सर्व गोष्टी सर्वसामान्यांना सुचतात पण प्रशासन डोळेझाक करतो हे दुर्दैव आहे असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून प्रशासनाला जाग आणून देण्यासाठी महानगरपालिकेचे सर्वोसर्वा असलेले प्रशासकीय अधिकारी आयुक्त साहेब यांच्या ढिसाळ कारभाराचा निषेध म्हणून त्यांना "गांधारी रत्न" हा पुरस्कार देऊन नगरकरांची तळतळ दाखवून देण्याचा प्रयत्न आम्ही केल्याचे वर्मा यांनी यावेळी म्हटले आहे.

कारण डोळे असुनही आंधळे पणाचं सोंग हे प्रशासन घेत आहे. या बाबतीत लोकांनी आरडाओरड सुरू केली, सोशल मीडियाच्या माध्यमातून खंत व्यक्त करण्यासाठी भावना मांडल्या लोकांच्या दवाखान्याच्या वाऱ्या वाढल्या , लोकांना पाठीचे, मणक्याचे , गुडघ्याचे व मानेचे आजार उद्भवयाला लागले तरी प्रशासनाला जाग येण्याची लक्षणं दिसत नाही. लोकांच्या वाहनांची देखील मोठे नुकसान होत आहे सारख्या नुकसानाला सर्वसामान्य लोक देखील वैतागलेल्या आहेत त्याचप्रमाणे महानगरपालिकेची शहर बससेवा देखील या खड्ड्यांचा शिकार झालेले आहे कारण खड्ड्यांच्या रस्त्यावरून जाऊन जाऊन त्या गाड्यांचा खिळखिळा झालेला आहे. तर आमची प्रशासनाला एक मागणी आहे ही बससेवा रद्द करून " शहर ट्रक सेवा " चालू करावी जेणेकरून अशा रस्त्यांमधून जाताना ट्रक सारखे वाहन उपयुक्त असून नागरिकांच्या जिवाला देखील धोका होणार नाही. येत्या आठ दिवसात जर सर्व खड्डे व्यवस्थित बुजवण्यात आले नाही तर खळखट्याकच्या पलीकडे जाऊन देखील आम्ही काम करू शकतो याची दखल प्रशासनाने घ्यावी असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा ,आदेश गायकवाड, प्रकाश गायकवाड , संकेत जरे , ओंकार काळे , अनिकेत शियाळ उपस्थित होते.

Updated : 24 Sept 2021 3:09 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top