वर्ध शहरातील खड्डे बुजवण्यासाठी काँग्रेसचे अनोखे आंदोलन
X
वर्धा : शहरातील एसटी डेपो रोडचे भूमिपूजन होऊन सुद्धा अजून पर्यंत या रस्त्याचे सिमेंट काँक्रेटिकरण किंवा डांबरीकरणाचे काम झालेले नाही. रोडवर अनेक खड्डे पडले असून यामुळे अनेक अपघात होतात तसेच पावसाळ्यात पाणी साचत असल्याने अपघात होतात. म्हणून शहर काँग्रेस कमेटीच्यावतीने शहरातील एसटी डेपो रोडवरील खड्ड्यामध्ये बेशरमचे झाड लावून आंदोलन करत भूमिपूजन फलकाची पूजा,आरती करत आंदोलन करण्यात आले.
यावेळी या मार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे अशी मागणी काँग्रेस कमेटीचे शहर अध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी केली. यावेळी शहर काँग्रेस कमेटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काँग्रेस कमेटीचे शहर अध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी यावेळी बोलताना स्थानिक लोकप्रतिनिधींवर सडकून टीका केली, दीड महिन्यापूर्वी या कामाचे भूमिपूजन करण्यात आलं,मात्र प्रत्येक्षात कामाला सुरुवात झाली नाही. या रस्त्यावर टाकण्यात आलेल्या डस्टमुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले होते. सोबतच पाऊस आल्यानंतर रस्त्याच्या लगत असणाऱ्या घरामध्ये पाणी शिरले होते त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला असं त्यांनी म्हटले आहे.
या रस्त्यावर अनेक रुग्णालय आहेत, स्थानिक नागरिकांची याच रस्त्यावरून वर्दळ असते , मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींनी केवळ फलक बाजी करून मोठेपणा केला पण कामाला काही सुरुवात झाली नाही. त्यामुळे येत्या आठ दिवसात जर या कामाला सुरुवात झाली नाही तर याही पेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसच्या वतीने नगरपालिका प्रशासनाला देण्यात आला आहे.