एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी दिला पाठिंबा
X
येवला : नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी वीजप्रश्नी शेतकऱ्यांनी मंत्री भारती पवार यांच्याकडे तक्रार केली , यावरून मंत्री पवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
तसेच एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होत आहे याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आमचा पाठिंबा असून महाविकास आघाडी सरकार या एसटी कर्मचाऱ्यांवर दडपशाही करून निलंबनाची कारवाई करत आहे .तसेच कर्मचाऱ्यांच्या मागण्या करता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व परिवहन मंत्री अनिल परब यांना आपण पत्रव्यवहार केला असल्याचं मंत्री भारती पवार यांनी सांगितले.
मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे. दरम्यान राज्यातील 2 हजाराहून अधिक एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. तर अनेक जिल्ह्यात खासगी चालकांच्या मदतीने लालपरी रस्त्यावर धावत आहे. दरम्यान परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आवाहन केलं आहे. सोबतच भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे एसटी कर्मचाऱ्यांना भडकवत असल्याचा आरोप मंत्री परब यांनी केला आहे.त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करत आहे असं परब वारंवार सांगत आहेत. मात्र, एसटी कर्मचारी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असं आंदोलकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे हे आंदोलन एसटी कर्मचारी संघटनाना बाजूला ठेवून केलं जातं आहे. कुणाचेही नेतृत्व नसलेलं हे आंदोलन आहे. त्यातच आता केंद्रीय मंत्री भारती पवार यांनीही या आंदोलनाला पाठींबा दिला आहे.