covidvaccine : केंद्र सरकारने सिरम आणि भारत बायोटेककडे नोंदवली लसींची मागणी
X
18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण मोफत करण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी केंद्र सरकारने लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडे आपली मागणी नोंदवली आहे. सिरम इन्स्टिट्यूटकडे 25 कोटी आणि भारत बायोटेककडे 19 कोटी डोसची मागणी नोंदवण्यात आली आहे. राज्यांऐवजी आता केंद्र सरकारच लसीकरणाचा भार उचलणार असल्याचे मोदींनी जाहीर केले आहे. पण 25 टक्के लसींची खरेदी खासगी हॉस्पिटल्सना करता येणार आहे. त्यामुळे केंद्र सरकार 75 टक्के लस खरेदी करणार आहे. पण खासगी हॉस्पिटल्सना लसींच्या किमती व्यतिरिक्त सेवाशुल्क म्हणून केवळ 150 रुपये आकारता येतील असेही पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर नीती आयोगाचे सदस्य व्ही.के.पॉल यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी खासगी हॉस्पिटल्सना लस विक्री करताना किती दर ठेवावा याचा निर्णय घ्यायचा आहे, असे पॉल यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता खासगी हॉस्पिटल्सना देण्यात येणाऱ्या लसची किंमत या कंपन्या ठरवणार आहे. तर जे हॉस्पिटल लस खरेदी करणार आहेत त्यावर राज्य सरकारांनी लक्ष ठेवायचे आहे असेही पॉल यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे खासगीत मिळणाऱ्या लस नेमक्या किती किमतीला मिळतील हे अजून तरी स्पष्ट झालेले नाही.