एकलव्य विद्यालयांमध्ये ३८,५०० शिक्षकांची नियुक्ती...
X
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री निर्मला सीतरमण यांनी आज देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये एकलव्य विद्यालयांमध्ये ३८ हजार ५०० शिक्षकांची नियुक्ती करण्यासोबत मोदी सरकार देशात १५७ नर्सिंग कॉलेज उघडणार असल्याची घोषणा सीतारमण यांनी केली आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्राशी संबंधीत अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. लोकसभेत देशाचा अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण यांनी शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी नवीन प्रोग्राम सुरु केले जाणार असल्याचे सांगितले.
शिक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाव्यतिरिक्त देशात १५७ नवीन नर्सिंग कॉलेज सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय नॅशनल डिजिटल लायब्ररी पंचायत आणि वॉर्ड स्तरापर्यंत उघडल्या जाणार आहेत. या ग्रंथालयामध्ये प्रादेशिक भाषांमधील तसेत इंग्रजी भाषेतली पुस्तकं उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. एनजीओंना सोबत घेऊन देशातल्या लोकांच्या साक्षरतेवर काम करण्यात येणार आहे.
याशिवाय पुढील तीन वर्षांमध्ये एकलव्य विद्यालयांच्या माध्यमातून ३८ हजार ८०० शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. या शाळांमधून साडेतीन लाख आदिवासी मुलांना शिक्षण दिलं जाणार आहे. तर २०२२ च्या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्राला १ लाख ४ हजार २७७ कोटी रुपये जाहीर झाले होते. यामध्ये शालेय शिक्षणसाठी ६३ हजार ४४९ कोटी रुपये तर उच्च शिक्षणासाठी ४० हजार ८२८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. सार्वभौमिक शिक्षणासाठी ३७ हजार ३८३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
सर्वसाधारण अर्थसंकल्प संसदेच्या पटलावर मांडण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा हा मोदी सरकारमधील शेवटचा अर्थसंकल्प आहे. कारण पुढच्या वर्षी देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या बजेटमध्ये केंद्र सरकारने कोणतीही कसर सोडलेली नाही.