#RussiaUkraineConflict : युक्रेनचे रशियाला प्रत्युत्तर, ५ लष्करी विमानं पाडली
X
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर रशियाला जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा युक्रेनने दिला होता. त्यानुसार आता युक्रेनने रशियाची ५ लष्करी विमानं पाडल्याचा दावा केला आहे. युक्रेनच्या लुहान्स्क भागात रशियाचे ५ लष्करी विमानं आणि एक हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा युक्रेनने केला आहे. तर दुसरीकडे रशियाच्या लष्कराने युक्रेनमधील विमानतळं आणि लष्करी उपकरणं निष्काम करण्यात आल्याचा दावा केला आहे. दरम्यान रशियाच्या आक्रमणानंतर युक्रेनमध्ये मार्शल लॉ लागू करण्यात आला आहे.
दरम्यान रायटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार रशियन सैन्याने युक्रेनच्या पूर्वमधील दोन गावं ताब्यात घेतली आहेत. तर रशियन सैन्याने खार्कीव्ह शहरातील रहिवासी इमारतींवर केलेल्या हल्ल्यात अनेकजण ठार झाल्याची माहिती मिळते आहे. युक्रेनमधल्या २५ शहरांवर रशियाने एकाचवेळी हल्ला केल्याचे वृत्तही काही माध्यमांनी दिले आहे. आपण फक्त लष्करी तळांवर हल्ला करत असल्याचा दावा रशियाने केला आहे. पण रशियाच्या या हल्ल्यांमध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याचा आरोप युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी केला असल्याची माहिती Wall Street Journal या माध्यमाने दिली आहे. एकीकडे रशियाने हल्ला केला असताना युक्रेनच्या कीव शहरातील नागरिकांनी भूमिगत मेट्रो स्टेशन्सवर आश्रय घेतला असल्याचेही वृत्त देण्यात येत आहे.
दरम्यान युक्रेनचे परराष्ट्रमंत्री डीमिट्रो कुलेबा यांनी ट्विट करुन नागरिकांना आवाहन केले आहे. पुतीन यांनी हल्ला केला असला तरी कुणीही पळून गेलेले नाही. लष्कर, अधिकारी आणि प्रत्येक जण काम करत आहे. युक्रेन लढणार आणि स्वसंरक्षण करणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे, तसेच युक्रेन जिंकणार असा दावाही त्यांनी केला आहे. पुतीन यांच्या या घुसखोरीचे माहित्या तुमच्या सरकारांना द्या आणि त्यावर कारवाई करायला सांगा, असे आवाहनही त्यांनी जगभरातील लोकांना केले आहे.