Home > News Update > आधी युद्ध कोरोनाचे, सुट्टीबिट्टी नंतर ! साताऱ्यातील दोघां पोलिसांचं एसपींना पत्र !

आधी युद्ध कोरोनाचे, सुट्टीबिट्टी नंतर ! साताऱ्यातील दोघां पोलिसांचं एसपींना पत्र !

आधी युद्ध कोरोनाचे, सुट्टीबिट्टी नंतर ! साताऱ्यातील दोघां पोलिसांचं एसपींना पत्र !
X

सरकारी कर्मचारी आपल्या वरिष्ठांकडे सवलतीसाठीचे जे अर्ज करीत असतात, त्यात प्रामुख्याने सुट्टीचे अर्ज मोठ्या प्रमाणात असतात. वेगवेगळे बहाणे करून कर्मचारी सुट्टी मागत असतात. सद्या कोरोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर दहा टक्के उपस्थितीमुळे शासनातील मोठी संख्या एकप्रकारे सुट्टीवरच आहे. अशा वातावरणात सुट्टी नको म्हणून सांगणारा सुखद धक्का देणारा अर्ज सातारा पोलिस अधिक्षकांसमोर आला आहे.

निलेश महेंद्र दयाळ आणि सागर दिलीप गोगावले या दोघां पोलिस कर्मचाऱ्यांनी आमची साप्ताहिक सुट्टी रद्द करा, म्हणून पोलिस अधिक्षकांना अर्ज केलाय. हे दोघेही सातारा बाॅम्ब शोधक व नाशक पथकातील पोलिस जवान आहेत. सद्या त्यांची नेमणूक साताऱ्यातील शाहुपुरी पोलिस ठाणे क्षेत्रात कोरोना प्रतिबंधक बंदोबस्तावर आहे. वास्तविक पाहता, सद्याचा काळ पोलिस कर्मचारी-अधिकारी यांच्यासाठी आणि त्यांच्या परिवारासाठी जोखमीचा आहे. कोरोना संसर्गाने पोलिसांचे मृत्यू ओढवलेले आहेत. अशा वेळी दयाळ आणि गोगावले यांनी साप्ताहिक सुट्टी नाकारली आहे.

दोघांनी दिलेलं कारण इतरांसाठी व एकूणच समाजासाठी प्रेरणादायी आहे. साताऱ्यात कोरोनाचे रुग्ण वाढलेत. अशावेळी जास्तीत जास्त पोलिसांची प्रत्यक्ष मैदानात गरज आहे, असं दोघां पोलिसांनी अधिक्षकांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

सागर गोगावले यांच्याशी मॅक्समहाराष्ट्र चं बोलणं झालं. गोगावले यांनी सांगितलं की आमची प्रेरणा एसपी तेजस्वीनी सातपुते आहेत. त्या अथक परिश्रम घेताहेत. आमच्या बैठकांत त्या उत्तेजन देतात, उत्साह वाढवतात. पारिवारिक समस्यांबद्दलही विचारपूस करतात. आज साताऱ्यातील ३०-४० लाखांच्या लोकसंख्येसाठी तीन हजारांच्या संख्येत पोलिस आहेत. त्यात पन्नाशी ओलांडलेल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना आराम करायला सांगण्यात आलाय. त्यातूनच आम्हाला वाटलं की आपण साताऱ्यातल्या साताऱ्यातच आहोत. कुटुंबाची गाठभेट होत राहते. मग वेगळ्या सुट्टीची आवश्यकता काय? म्हणून मग अर्ज केला. बाॅम्ब शोधक पथकातील काम सांभाळून आम्ही कोरोना बंदोबस्ताचंही काम करतोय.

https://twitter.com/AnilDeshmukhNCP/status/1257696304085467136?s=19

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीटरवर तुमचं अभिनंदन केलंय, असं सांगितल्यावर गोगावले म्हणाले की वरिष्ठांचं कौतुक मनोबल वाढवणारंच ठरतं. पण आम्ही "हिरोगिरी" करतोय, असं म्हणणारेही आहेत, म्हणून थोडं वाईटही वाटतं. समजत नाही आम्ही योग्य पाऊल उचललं की अयोग्य !

निलेश दयाळ यांनी मॅक्समहाराष्ट्र ला सांगितलं की गोगावले व मी एकाच बॅचला पोलिसांत आलोय. दोन वर्षे आम्ही बाॅम्ब शोधक पथकात एकत्र आहोत आणि आता कोरोना बंदोबस्तातही एकाच पोलिस ठाण्यांतर्गत ! त्यामुळे पत्रही एकत्र दिलं. पन्नाशीपुढच्या पोलिसांना सवलत देण्यात आलीय, ती आपण भरून काढावी, एवढाच हेतू ; बाकी दुसरं काहीच मनात नव्हतं ! सहज घडलंय सगळं. कुटुंबाची प्रतिक्रिया काय यावर दयाळ म्हणाले की बहिणीचा मेसेज आलाय. चांगलं केलं, काळजी घ्या.

Updated : 6 May 2020 3:25 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top