कांद्याने केले मालामाल, शेतकऱ्याने बांधला कांद्याचा पुतळा
X
नाशिक : गेल्या काही वर्षात बदलते वातावरण आणि नैसर्गिक संकटांनी राज्यातील बहुतांश शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पण काही शेतकरी असेही आहे ज्यांना नगदी पिकांमुळे मोठा फायदा देखील झाला आहे. कांद्याच्या पिकामुळे उत्पन्न चांगले झाले आहे, म्हणून एका शेतकऱ्यांने आपल्या बंगल्याच्यावर चक्क कांद्याची प्रतिकृतीच उभारली आहे.
येवला तालुक्यातील धनकवाडी येथील साईनाथ भगवंत जाधव आणि अनिल भगवंत जाधव या कांदा उत्पादक शेतकरी भावांनी आपल्या बंगल्यावर 150 किलो वजनाची भव्य कांद्याची प्रतिकृतीच साकारली आहे. या शेतकऱ्यांच्या घराण्यात आधीपासूनच कांदा पीक घेतले जात आहे. याच कांदा पीकामुळे उत्पन्न मिळत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आपल्या बंगल्यावर कांद्याची प्रतिकृती उभारण्याचा निर्णय त्यांनी घेतला. येवला तालुक्यामध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. आपल्याला चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्या कांद्याची प्रतिकृती बंगल्यावर साकारावी अशी कल्पना या दोन्ही भावांच्या मनात आली, त्यानंतर त्यांनी आपली कल्पना प्रत्यक्षात उतरवली व 150 किलो वजनाची भव्य अशी कांद्याची प्रतिकृती आपल्या बंगल्यावर साकारली. सध्या का अनोखा कांदा सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. तर अनेक शेतकरी बंगल्यावरील भव्य कांदा बघण्यासाठी येत आहेत.