CovidVaccine : 2 अब्ज लसींपैकी 60 टक्के लसींचा वापर 3 देशांमध्ये
जागतिक लसीकरणाबद्दल जागतिक आरोग्य संघटनेची महत्त्वाची माहिती
X
कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी आणि यातून बाहेर पडण्यासाठी कोरोनावरील लस हे एकमेव साधन आहे. त्यामुळे जगभरातील देशांमध्ये लवकरात लवकर लसीकरण करण्यावर भर दिला जात आहे. यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने एक महत्त्वाची दिली आहे. जगभरात आतापर्यंत कोरोनावरील 2 अब्ज लस तयार करण्यात आल्या आहेत. यापैकी 60 टक्के लस ह्या अमेरिका, चीन आणि भारत या तीन देशांमध्ये वापरण्यात आल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेड्रॉस घेब्रेसेस यांनी दिली आहे. नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
भारत, अमेरिका आणि चीनमध्ये देण्यात आलेल्या लस या त्याच देशांमध्ये तयार करण्यात आल्या आहेत. जगभरात आतापर्यंत 200 कोटी लसींची निर्मिती करण्यात आली आहे. या लसी 212 देशांमध्ये वितरीत करण्यात आल्या आहेत. या 200 कोटी लसींपैकी 75 टक्के लसींचा वापर हा केवळ 10 देशांमध्ये करण्यात आला आहे. तर यापैकी 60 टक्के लस भारत, अमेरिका आणि चीन या तीन देशांमध्येच वापरण्यात आल्याची माहितीही टेड्रॉस यांनी दिली आहे. पण जगभरातील गरिब देशांमध्ये केवळ 0.5 टक्के लसींचे वाटप झाले आहे.
या देशांमधील लोकसंख्या जगातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत 10 टक्के असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. दरम्यान लसींच्या निर्मितीचा वेग वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच यामध्ये सिरम इन्स्टिट्यूटची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. भारतात आलेल्या दुसऱ्या लाटेमुळे लसींच्या निर्मितीवर परिणाम झाला. पण आता जगातील सगळ्यात मोठी लस निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटच्या उत्पादनावर लसीकरण मोहीम अवलंबून असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत जगभरातील किमान 30 ते 40 टक्के लोकसंख्येचे लसीकरण होणे गरजेचे आहे, असेही जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.