जगभरातील बडे नेते, कंपन्या आणि सेलिब्रिटींचे ट्विटर हॅक
X
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, बिल गेट्स, एपल कंपनी, उबर, इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू, अमेरिकेचे माजी उपराष्ट्रपती जो बीडेन यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आल्याचा प्रकार घडलाय. यानंतर ट्विटरने तातडीनं सगळ्यांचे ट्विटर अकाऊंद स्थगित केले आहेत.
ट्विटर अकाऊंट हॅक केल्यानंतर हॅकरने या दिग्गजांच्या अकाऊंटवरुन बिटकॉईन मागण्यास सुरूवात केल्याने खळबळ उडाली आहे. “प्रत्येकजण माझ्याकडून परतफेडीची अपेक्षा ठेवत असतो. आता ती वेळ आली आहे. पुढील 30 मिनिटात माझ्या बिटकॉईन पत्त्यावर जे पैसे पाठवतील त्यांना मी दुप्पट रक्कम परत देणार आहे, तुम्ही एक हजार डॉलर पाठवा मी 2 हजार डॉलर परत करेन” असे ट्विट बिल गेट्स यांच्या अकाऊंटवरुन हॅकरने केले आहे. पण हे अकाऊंट कुठून आणि कुणी हॅक केले आहेत याची माहिती अजून मिळू शकलेली नाही.
We are aware of a security incident impacting accounts on Twitter. We are investigating and taking steps to fix it. We will update everyone shortly.
— Twitter Support (@TwitterSupport) July 15, 2020
“सध्या तुम्हाला ट्विट करण्यास आणि पासवर्ड रिसेट करणे शक्य होत नाहीये, पण आम्ही यावर काम करत असून लवकरच यात सुधारणा केली जाईल”, असे ट्विटरने सांगितले आहे.
"double your Bitcoin" हा घोटाळा गेल्या काही वर्षांपासून गाजतोय. पण यावेळी हॅकरने ज्यांचे लाखो फॉलोअर आहेत त्यांना लक्ष्य केले आहे. हे सर्व ट्विट डिलिट करण्यात आले असले तरी यामध्ये किती लोकांनी पैसे भरले ते समजू शकलेले नाही. पण यावरुन ट्विटरच्या सायबर सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान या सायबर हल्ल्यानंतर ट्विटरच्या शेअर्सवर परिणाम झाला असून ट्विटरचे शेअर 3 टक्क्यांनी घसरले आहे.