Home > News Update > मोठी बातमी : रस्त्या अभावी घरीच प्रसुती, जुळ्या बाळांचा मृत्यू, आईला झ़ोळीतून नेले

मोठी बातमी : रस्त्या अभावी घरीच प्रसुती, जुळ्या बाळांचा मृत्यू, आईला झ़ोळीतून नेले

शहरात जायला रस्ता नसल्याने घरातच करावी लागली प्रसुती, रस्त्या अभावी मातेला 3 किमी झोळीतून नेलं खोडाळा उपकेंद्रात

मोठी बातमी : रस्त्या अभावी घरीच प्रसुती, जुळ्या बाळांचा मृत्यू, आईला झ़ोळीतून नेले
X

देशात अमृतमहोत्सव साजरा होत असतांना मोखाडा तालुक्यातील मरकटवाडीला रस्ता नसल्याने, एका गरोदर महिलेला घरातच प्रसूती करण्याची वेळ आली, तिने जुळ्या बालकांना जन्मही दिला मात्र काही वेळातच दोन्ही बालके उपचारा अभावी दगवल्याची दुर्दैवी घटना शनिवारी घडली. दरम्यान मातेची प्रकृतीही गंभीर झाल्यामुळे तिला 3 किलोमीटर डोंगर कपारीतून भरपावसात मुख्य रस्त्यावर आणले तेथून तिला खोडाळा उपकेंद्रात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरू आहे.


मर्कटवाडी येथील वंदना यशवंत बुधर ही महिला सात महिन्याची गरोदर होती, तिला अचानक शनिवारी प्रसूतीच्या कळा येऊ लागल्या, कुटुंबियांनी तत्काळ आशा सेविकेला संपर्क केला, आशा सेविकाही महिलेच्या घरी पोहोचली, तिने 108 एमबुलन्स सुद्धा बोलावली, मात्र मुख्य रस्ता ते मर्कटवाडी गावात जाण्यासाठी रस्ता न्हवता. दरम्यान महिलेला खूपच वेदना होत होत्या, तिची प्रसूती घरातच झाली, तिने जुळ्या बालकांना जन्मही दिला मात्र सात महिन्याची प्रसूती असल्याने बालक कमकुवत होते, त्यांना रुग्णालयात तात्काळ दाखल करणे आवश्यक होते, काही वेळातच उपचारा अभावी दोन्ही बालकांनी प्राण सोडला.

दरम्यान रक्तस्राव झाल्यामुळे महिलेची प्रकृती खालावत होती, तिला गावकऱ्यांनी झोळी करून डोंगर दऱ्या कपारीतून थेट 3 किमी अंतर पार करत मुख्य रस्त्यावर आणले तेथून तिला एमबुलन्सद्वारे खोडाळा उपकेंद्रात दाखल करण्यात आले, तिच्यावर उपचार सुरू आहेत.


मोखाडा पासून 30 ते 35 किमी अंतरावर दरी डोंगरात वसलेल्या बोटोशी ग्रामपंचायतमधील 50 घरे असलेल्या 226 लोकवस्ती, अंगणवाडी, इयत्ता 5 वी पर्यंत शाळा असलेल्या मर्कटवाडी व बोटोशी येथील 105 घरे व 1 हजार 400 लोकसंख्येच्या गावात आदिवासींना रस्त्या अभावी मरणयातना भोगाव्या लागत आहेत. या गावात यापूर्वीही रूग्णांना वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे जीव गमवावा लागला आहे. दरम्यान 2 ऑगस्ट रोजी नवनिर्वाचित जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी या गावाची पाहणी केली होती, त्यांनी या गावात तातडीने रस्ता मंजूर करण्याचे आदेश दिलेले आहेत.

आता गावकरी शासन आपले कर्तव्य कधी पूर्ण करतं, रस्ता कधी तयार होतो याची वाट पाहत आहेत.


आमची रस्त्याची मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी, जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश तर दिले आहेत, मात्र ते सुस्त असलेले बांधकाम विभाग कधी पूर्ण करणार, अजून किती निष्पाप जीव जाणार अशा दुविधेत मर्कटवाडी वासीय असल्याचे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते तुकाराम पवार यांनी सांगितले.

Updated : 16 Aug 2022 2:45 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top