आदिवासी विद्यार्थी ११वी प्रवेशापासून वंचित; जिजाऊ संघटनेमार्फत ठिय्या आंदोलन
जव्हार प्रकल्पांतर्गत २८७ आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित शाळांमध्ये अद्याप प्रवेश मिळाला नसल्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधःकारमय झाले आहे. त्यामुळे दि.२९ ऑगस्ट,२०२२ रोजी या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी जव्हारमधील राजीव गांधी स्टेडियम येथील प्रकल्प कार्यालयासमोर जिजाऊ संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते , प्रवेश न झालेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांचे ठिय्या आंदोलन झाले आहे, प्रतिनिधी रवींद्र साळवेंचा रिपोर्ट....
X
आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत नामांकित शाळांमध्ये शिक्षण घेऊन २०२२ या सालामध्ये १० वी मध्ये पास झालेले विद्यार्थी गेले २ महिने घरी राहून घरीच काम करत आहेत. त्यांना शासनाने शिक्षणापासून वंचित ठेवले असल्याची चिंता पालक वर्गात सुरू झाली आहे.
आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत जव्हार, मोखाडा, विक्रमगड या तालुक्यातील शेकडो विद्यार्थी – विद्यार्थीनी इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमध्ये इयत्ता १० वी पर्यंतचे शिक्षण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. या संपूर्ण विद्यार्थ्यांपैकी १३२ विद्यार्थ्यांना पाचगणी येथील नामांकित शाळेत प्रवेश देण्याची प्रक्रिया झाली असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु २७८ विद्यार्थ्यांना अजूनही वरिष्ठ कार्यालयाकडून प्रवेशाबाबत आदेश नसल्यामुळे प्रवेशापासून वंचित रहावे लागत आहे.
भारती विद्यापीठ, विक्रमगड (विद्यार्थी - ८५), ज्ञानेश्वर माऊली, पनवेल (विद्यार्थी - ८७), सुषमा पाटील विद्यालय, पनवेल (विद्यार्थी - १०६) असे एकूण २८७ विद्यार्थी नामांकित शाळांमधून दहावी उत्तीर्ण झाले आहेत. परंतु अकरावी प्रवेशासाठी या सर्व विद्यार्थ्यांना अजूनही प्रवेश मिळालेला नाही.
महत्वाची बाब म्हणजे हे सर्व विद्यार्थी आदिवासी समाजातील असून सर्व विद्यार्थ्यांची घरची आर्थिक परिस्थिती ही अत्यंत हलाकीची आहे. या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याबाबत तात्काळ कार्यवाही व्हावी. तसेच या सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास या नुकसानास आदिवासी विकास प्रकल्प प्रशासन जबाबदार राहील. याबाबत लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास जिजाऊ संघटना महाराष्ट्र यांच्या मार्फत दि.२९ ऑगस्ट २०२२ रोजी आंदोलन करण्यात येईल, असे पत्र जिजाऊ संघटना पालघर यांच्या वतीने आदिवासी विकास प्रकल्प जव्हार, प्रकल्प अधिकारी यांना देण्यात आले होते.
अद्यापही या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळाल्यामुळे या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी जव्हारमधील राजीव गांधी स्टेडियम येथील प्रकल्प कार्यालयासमोर जिजाऊ संघटना, प्रवेश न झालेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्यासह ठिय्या आंदोलन करण्यात आले.
त्यामुळे येत्या आठ ते दहा दिवसात प्रवेश प्रक्रिया सुरू करून लवकरात लवकर पालघर जिल्ह्यातील व नजीकच्या शाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल असे लेखी आश्वासन आदिवासी विकास प्रकल्प जव्हार, मा.प्रकल्प अधिकारी यांनी दिल्यानंतर जिजाऊ संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने पुकारलेले ठिय्या आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात मागे घेण्यात आले.
परंतु या आश्वासनानंतर दिलेल्या वेळेत प्रवेश प्रक्रिया सुरू न झाल्यास व विद्यार्थ्यांना जवळच्या शाळा न मिळाल्यास जिजाऊ संघटना तीव्र आंदोलन पुकारेल असा इशारा प्रशासनाला देण्यात आला.