Home > News Update > आदिवासी शेतमजुर आत्महत्या प्रकरण, मुख्य आरोपीला अटक

आदिवासी शेतमजुर आत्महत्या प्रकरण, मुख्य आरोपीला अटक

पालघर जिल्ह्यातील मोखाडा मध्ये ५०० रूपयांच्या कर्जावरून होणाऱ्या वेठबिगारीच्या जाचाला कंटाळून काळु पवार या आदिवासी कातकरी मजुराने आत्महत्या केली होती. याप्रकरणी आरोपी रामदास कोरडे याला मोखाडा पोलीसांनी अटक केली आहे.

आदिवासी शेतमजुर आत्महत्या प्रकरण, मुख्य आरोपीला अटक
X

पालघर जिल्ह्यामधील मोखाडा तालुक्यातील आसे गावात राहणारे काळु पवार या आदिवासी कातकरी मजुराने आपल्या मुलाच्या अंत्यसंस्कार साठी गावातीलच रामदास कोरडे या धनिकाकडुन ५०० रूपये उसने घेतले होते. त्या ५०० रूपयांच्या मोबदल्यात रामदासने काळु ला वेठबिगारासारखी वागणूक देत त्याचा छळ केला होता. या छळाला कंटाळून काळू यांनी गळफास घेत आत्महत्या केली होती. याबाबतीत काळु यांच्या पत्नी सावित्री पवार यांनी त्याबाबत मोखाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

मोखाडा पोलीसांनी आरोपी रामदास कोरडे याच्यावर वेठबिगार पध्दत निर्मुलन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. परंतू रामदास कोरडे हा आपल्या कुटूबांसह फरार झाला होता. मोखाडा पोलीसांची दोन पथके रामदासचा शोध घेत होती. रविवारी ( २२ ऑगस्ट) ला रामदास कोरडे याला अटक करण्यात मोखाडा पोलीसांना यश आले आहे. यानंतर आरोपी रासदासला सोमवारी (२३ ऑगस्ट) जव्हार च्या प्रथम वर्ग न्यायालयात हजर करण्यात आले होते. जव्हार न्यायालयाने रामदासला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

भाजप नेते प्रविण दरेकर यांनी घेतली होती कुटूंबियांची भेट

आत्महत्या केलेल्या काळू पवार यांच्या कुटुंबियांची विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी भेट घेतली होती. "ही घटना अतिशय गंभीर असून या आदिवासी कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. हा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही" असे दरेकर यांनी म्हटले होते. तसेच या आदिवासी कुटुंबाची घरकुल योजनेची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, तसेच त्यांच्या मुलांना आदिवासी आश्रम शाळेत दाखल करुन घ्यावे आणि खावटी योजनेचा लाभ या आदिवासी कुटुंबाला लवकर मिळवून द्यावा अशा सूचनाही दरेकर यांनी यावेळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

...म्हणुन घेतले होते उसने पैसे

दरम्यान शेतमजुर असलेल्या काळू पवारच्या मुलाचा गेल्यावर्षी पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. याच मुलाच्या अंत्यविधीसाठी काळू पवार यांनी आरोपी रामदास कोरडे कडून ५०० रूपये उसने घेतले होते. पण त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजलेले नाही. याचा तपास पुढे का झाला नाही, असा जाबही दरेकर यांनी यावेळी तिथे उपस्थित डीवायएसपी आणि प्रांत अधिकाऱ्यांना विचारला होता.

Updated : 24 Aug 2021 7:14 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top