पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची बदली
X
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. ज्योती देवरे यांनी आमदार निलेश लंके यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तर ज्योती देवरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे तसेच सह कर्मचाऱ्यांना चुकीची वागणूक दिल्याचे आरोप झाले. त्यानंतर हे प्रकरण चांगलच तापलं, आरोप- प्रत्यारोप झाले, आंदोलनं झाली, चौकशी झाली, राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी झाल्या. मात्र , अखेर तहसीलदार ज्योती देवरे यांची बदली झाली आहे.
ज्योती देवरे यांची बदली आता जळगाव येथे झाली आहे.त्या आता संजय गांधी निराधार योजनेत काम पाहतील. महिला अधिकारी म्हणून आमदार, प्रांताधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी,पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकारी यांच्याकडून त्रास होत असल्याचा आरोप तहसीलदार देवरे यांनी केला होता.
या तक्रारीत तथ्य नसल्याचा महिला चौकशी समिती, विभागीय आयुक्त यांच्या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर देवरे यांच्या बदलीचा आदेश शासनाने काढला असल्याचे समजते.
दरम्यान तहसीलदार देवरे यांच्या बदलीच्या आदेशामुळे आमदार नीलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
ऑगस्ट २०१८ मध्ये देवरे या तहसीलदार म्हणून पारनेर येथे रूजू झाल्या होत्या. आमदार नीलेश लंके यांचे कट्टर कार्यकर्ते अॅड. राहुल झावरे यांच्या विरोधात नुकतीच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. यात तहसीलदार देवरे यांचा हात असल्याचा आरोप झावरे यांनी केला होता. दरम्यान तहसीलदार देवरे यांच्या बदली नंतर
झावरे यांनी म्हटले आहे की, वादग्रस्त तहसिलदार देवरे यांच्याविरोधात तक्रारी करण्यात आल्यानंतर कारवाई टाळण्यासाठी विविध मार्गांनी त्यांनी प्रयत्न केले होते, मात्र त्याला यश आले नाही. देवरे यांच्याविरोधात यापूर्वीच लोकायुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. आज मंगळवार दि.14 रोजी त्यांच्या विरोधात लाचलुचपत विभागाकडे तक्रार करण्यात येणार आहे.
आता ज्योती देवरे यांच्या नंतर पारनेरला कोण तहसीलदार मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.