Home > News Update > देशातील पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस कळंबोली स्टेशनवरून रवाना

देशातील पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस कळंबोली स्टेशनवरून रवाना

महाराष्ट्राला रेल्वेद्वारे ऑक्सिजन मिळण्यासाठी पहिले पाऊल सोमवारी पडले.

देशातील पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस कळंबोली स्टेशनवरून रवाना
X

कोरोनाच्या संकटात देशात सध्या ऑक्सिजनचा तुटवड़ा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संपूर्ण देशात ऑक्सिजनचा रेल्वेने पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राला लागणारा ऑक्सिजन घेण्यासाठी पहिली ट्रेन विशाखापट्टणन येथे रवाना झाली आहे. रायगड जिल्ह्यातील कळंबोली येथील रेल्वे स्टेशनवरुन सोमवारी विशेष ऑक्सिजन ट्रेन विशाखापट्टणमला लिक्वीड ऑक्सिजन आणण्यासाठी रवाना झाली. या रेल्वेत ट्रक टँकर पाठविण्यात आले आहेत.

रेल्वे गाडीवर टँकर चढवण्यासाठी लागणारा विशेष प्लॅटफॉर्म आणि विशेष ट्रॅक गेल्या 48 तासांत कळंबोली इथे तयार करण्यात आला आहे. विशाखापट्टनम येथे रेल्वेमार्फत राज्य सरकारला ऑक्सिजन पुरवठा करण्यात येणार आहे. कोरोना काळात महाराष्ट्रात ऑक्सीजनचा तुटवडा कमी करण्यासाठी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आणण्यासाठी आणि रिकामे ऑक्सिजन सिलेंडर नेण्यासाठी रेल्वेने ही सोय केली आहे. ऑक्सिजन एक्सप्रेसच्या वाहतुकीसाठी ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आला आहे. कळंबोली रेल्वे स्टेशनहून दहा रिकामे टँकर्स विशाखापट्टनम, जमशेदपूर, रुरकेला , बोकारो येथे रवाना झाले आहेत. तेथून ऑक्सिजन भरुन ही ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्रात दाखल होणार आहे .


मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सरकारने लिक्विड मेडिकल ऑक्सिजन ( एलएमओ ) टँकर रेल्वेने नेता येऊ शकतात का याची विचारणा रेल्वे मंत्रालयाकडे केली होती. रेल्वेने तातडीने एलएमओ वाहतुकीची तांत्रिक शक्यता शोधून काढली. फ्लॅट वॅगन्सवर ठेवलेल्या रोड टँकरसह रो-रो सेवेद्वारे लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची वाहतूक करावी लागेल , असं रेल्वेने सुचवलं होते.17 एप्रिल रोजी रेल्वे बोर्डाचे अधिकारी, राज्य परिवहन आयुक्त आणि उद्योग प्रतिनिधी यांच्यात लिक्विड मेडिकल ऑक्सिजनच्या वाहतुकीशी संबंधित मुद्द्यांवर बैठक झाली.

रेल्वे मार्गावर काही ठिकाणी रोड ओव्हर ब्रिज आणि ओव्हरहेड इक्विपमेंट्सच्या उंचीच्या मर्यादेमुळे अडचणी येण्याची शक्यता होती. त्यामुळे रस्ते टँकरच्या विविध वैशिष्ट्यांपैकी, रोड टँकर टी 1618 चे मॉडेल वापरता येणे शक्य असल्याचे सिद्ध झाल्यावर हे टँकर 1290 मिमी उंचीसह सपाट वॅगनवर चढविण्यात आले. या वॅगनच्या वाहतुकीच्या सर्व चाचण्या रेल्वेने घेतल्या आहेत .

Updated : 19 April 2021 9:08 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top