भाजप नेत्याकडून अंधारेंना धमकी, म्हणाले लवकरचं..
X
सध्या राज्यभरात नाशिक ड्रग्स रॅकेटप्रकरणी जोरदार चर्चा सुरू आहे. यातच आता शिवसेना उबाठा गटाच्या सुषमा अंधारे चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. राज्य सरकारमधील मंत्री दादा भुसे आणि शंभूराज देसाई यांच्यावर गंभीर आरोप करत नार्को टेस्टची मागणी अंधारे यांनी केली होती. या प्रकरणातील आरोपी ललित पाटील याला18 ऑक्टोबर मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “आता सगळ्यांची तोंडं बंद होणार” असे व्यक्तव्य केले होते. यावर सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले होते. त्यातच, आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक्स पोस्ट वरून, ‘सुषमा अंधारे यांचा लवकरच महुआ मोईत्रा होणार’ इशारा दिला आहे.
मोहित कंबोज काय म्हणाले
नाशिक ड्रग्ज रॅकेटप्रकरणी महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले असताना आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक्स पोस्ट केली. ‘सुषमा अंधारे यांचा लवकरच महुआ मोईत्रा होणार’ असं एक्स पोस्ट कंबोज यांनी केली आहे. त्यांच्या या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सुषमा अंधारे यांचं प्रत्युत्तर
दरम्यान मोहित कंबोज यांच्या एक्स पोस्टवर सुषमा अंधारे यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. मोहित कंबोज यांना प्रत्युत्तर देताना त्यांनी फडवीस यांना देखीलं टार्गेट केलं आहे. त्या एक्स पोस्ट करत म्हणाल्या की “महाराष्ट्रात राहून, महाराष्ट्राचं खाऊन महाराष्ट्राच्या बहिण-लेकीना बिनधास्तपणे धमकावण्याची हिम्मत देवेंद्रजी आपल्या आशीर्वादामुळे येते. मी फडणवीस साहेबांची आभारी आहे.” सुचकं वक्तव्य अंधारे यांनी केलं आहे
महुआ मोईत्रा प्रकरण?
तृणमूल कॉँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा या संसदेतील आक्रमक भाषणशैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. परंतु, त्या आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आल्या आहेत. महुआ मोईत्रा यांच्यावर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्याकडून संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप केला होता. याबाबत दुबे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून महुआ मोईत्रा यांच्याविरोधात चौकशी समिति स्थापन करण्याची तसेच सभागृहातून निलंबित करण्याची मागणी केली आहे.