महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना भर चौकात मृत्यूदंड द्यावा- कवाडे
X
शाहू, फुले, आंबेडकरांचा वारसा घेऊन चालणाऱ्या या महाविकास आघाडी सरकारच्या काळात दलित,वंचित, बौद्धांवर अत्याचार कमी होतील अशी पीपल्स रिपब्लिकन पक्षाला आशा होती मात्र तसं होताना दिसत नाही, सोबतच राज्यात महिला अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे अशी खंत पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केली ते अहमदनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान यावेळी बोलताना कवाडे म्हणाले की, राज्यात महिला सुरक्षेसोबतच दलित, वंचित समाजावर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी सरकारने कठोर पावलं उचलणे गरजेचे आहे.महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कारागृहाच्या चार भिंतीच्या आत मृत्यू दंडाची शिक्षा न करता त्यांना भरचौकात जाहीर मृत्यू दंडाची शिक्षा व्हायला हवी.
दरम्यान मुंबईतील बलात्काराच्या घटनेबाबत बोलताना कवाडे म्हणाले की, हाथरस प्रमाणेच मुंबईची घटना आहे, अशा पद्धतीने कौर्याची परिसिमा गाठणारी मनोवृत्ती ठेचून काढण्यासाठी तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील
शक्ती कायदा करावा असं ते म्हणाले.सोबतच पीडीत महिलेच्या कुटुंबांना सरकारने आर्थिक मदत करावी,पीडितेच्या पाल्यांचा शैक्षणिक खर्च उचलावा आणि कुटुंबातील सदस्याला शासकीय सेवेत घ्यावे अशी मागणी त्यांनी केली.
न्यायालयाच्या निकालानंतर रद्द करण्यात आलेल्या ओबीसींचे राजकीय आरक्षण पुर्ववत मिळत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका पुढे ढकलाव्यात अशी देखील मागणी त्यांनी केली. ओबीसींना प्रतिनिधित्व करण्यासाठी राजकीय आरक्षण देणे गरजेचे आहे, केंद्राकडून इंपिरीकल डेटा मिळत नसेल तर राज्य सरकारने डेटा गोळा करण्यासाठी तयारी करावी असं त्यांनी म्हटले.
दरम्यान महाविकास आघाडी सरकारला सत्तेत आणण्यासाठी घटक पक्ष म्हणून आम्ही देखील प्रयत्न केले आहेत, त्यामुळे आम्हाला सत्तेत वाटा देण्याची मित्र पक्षाची नैतिक जबादारी आहे असं ते म्हणाले. आम्हाला दया, भीक नको हक्काचा सत्तेचा वाटा हवा आहे असंही ते म्हणाले.
दरम्यान 14 ऑक्टोबर पासून पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राज्यव्यापी सदस्य नोंदणी अभियान सुरू होणार असून, 5 लाख सदस्य नोंदणीचे आमचे उद्दिष्ट आहे अशी माहिती त्यांनी दिली.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून सत्ताधारी मंत्र्यांवर होत असलेल्या भ्रष्टाचाराचे आरोपांबद्दल बोलताना 'आपलं ते बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्टे' अशी त्यांची भूमिका आहे.भाजपच्याही नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत त्यावर देखील त्यांनी बोलावं असं कवाडे म्हणाले.