परदेशी पाहुण्यांनी फिरवली जायकवाडी जलाशयाकडे पाठ
युरोपातील कमालीचा गारठा असह्य होत असल्याने दरवर्षी लाखोंच्या संख्येने विदेशी पक्षी औरंगाबादच्या जायकवाडी जलाशयावर वास्तव्यास येतात. मात्र, दरवर्षी लाखोंच्या संख्येत येणारे हे विदेशी पाहुणे यंदा मात्र फारच कमी आलेत
X
औरंगाबाद // युरोपातील कमालीचा गारठा असह्य होत असल्याने दरवर्षी लाखोंच्या संख्येने विदेशी पक्षी औरंगाबादच्या जायकवाडी जलाशयावर वास्तव्यास येतात. मात्र, दरवर्षी लाखोंच्या संख्येत येणारे हे विदेशी पाहुणे यंदा मात्र फारच कमी आलेत. वन्यजीव विभागाच्या वतीने दोन दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या पक्षी गणनेत हे वास्तव समोर आले आहेत. एवढंच नाही तर अवघ्या शहरवासियांचं लक्ष वेधून घेणारा मोहक फ्लेमिंगोदेखील (Flamingos) यावर्षी दिसणं दुर्मिळ झालंय. त्यामुळे पक्षीप्रेमींचा मोठा भ्रमनिरास झाला आहे.
वन्य जीव विभागाच्या वतीने नुकतीच जायकवाडी, पिंपळवाडी,मावसगव्हाण, लामगव्हाण, खानापूर, बोरगाव या ठिकाणी करण्यात आलेल्या पक्षी गणनेत केवळ दहा हजारांच्या जवळपास पक्षी आढळलेत. एरवी हे पक्षी लाखोंच्या संख्येने असतात.
तर डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात कमी थंडी व पाणथळ जागेवरील गाळपेरा पाहता जायकवाडी धरणावर मोठ्या संख्येने आढळणारा फ्लेमिंगो यंदा दिसणे दुर्मिळ झाले आहे. यंदा पक्ष्यांचे प्रमुख खाद्य असलेले छोटे शिंपले, शेवाळे दिसून येत नसल्याने स्थलांतरीत पक्ष्यांची संख्या कमालीची घटली आहे. जायकवाडी धरणावर दरवर्षी 225 विविध जातींचे पक्षी आढळतात. यंदा मात्र फक्त 60 जातींचेच पक्षीच आढळून आलेत. पक्षी अभ्यासक डॉ. किशोर पाठक हे दरवर्षी जायकवाडी आणि परिसरातील पक्षी गणनेत सहभाग घेतात. यावर्षी देखिल तीन पथकांनी जायकवाडी परिसरातील 12 ठिकाणी ही गणना केली. डॉ. किशोर पाठक म्हणाले की, जायकवाडी धरणावर दरवर्षी डिसेंबरदरम्यान फ्लेमिंगोसह युरोप, लडाख,सैबेरिया,
तिबेट, कच्छ, दक्षिण रशिया आदी देशांतून स्थलांतरीत पक्षी येतात. थंडीच्या काळात मार्च अखेरपर्यंत त्यांचा मुक्काम असतो. यंदा मात्र , डिसेंबरमध्येच पक्षी कमी झाल्याचे समोर आले आहे. जायकवाडी धरणाच्या पाण्यात अनेक कंपन्या रासायनिक द्रव्य टाकत असल्याने पक्ष्यांचे खाद्य असलेले छोटे शिंपले, शेवाळ कमी झालेत. तसेच थंडीही काही प्रमाणात कमी झाल्याने या पक्ष्यांची संख्या अचानक घटल्याचे डॉ. पाठक यांनी सांगितले. त्यामुळे डिसेंबर ते जानेवारी, फेब्रुवारीदरम्यान जायकवाडी आणि परिसरात पक्षी निरीक्षणासाठी जाणाऱ्या निसर्गप्रेमींची यंदा मात्र भ्रमनिरास होत आहे.