वाईन आणि दारू यात फरक, अजित पवारांचे विरोधकांना उत्तर
X
सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र होऊ देणार नाही, अशी टीका करत तीव्र विरोध केला आहे. तसेच सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली आहे. यासर्व वादावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. वाईन आणि दारू यात फरक आहे,पण उगाच गैरसमज केला जातोय, या शब्दात अजित पवार यांनी विरोधकांना फटकारले आहे.
वाईन आणि दारू यामध्ये जमीन-अस्मानचा फरक आहे, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली आहे. पुण्यामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अनेक शेतकरी द्राक्ष, काजू यापासून वाईन तयार करतात. राज्यात अजून इतरही फळांपासून वाईन तयार केली जाते. राज्यात वाईन पिणाऱ्यांचे प्रमाण खूप कमी आहे. किंबहुना जितकी वाईन तयार केली जाते तेवढीही राज्यात खपत नाही, त्यामुळे ती वाईन परराज्यांत आणि परदेशात निर्यात केली जाते. काही देशात तर पाण्याऐवजी वाईन प्यायली जाते, पण काहींनी मद्य राष्ट्र म्हणत हा विषय वाढवला असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
दुसरीकडे बारा आमदारांच्या निलंबनाबाबत अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. हा निर्णय विधिमंडळाने घेतला होता. पण जो निकाल आला आहे त्याबद्दल कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.