"...तर पुन्हा एकदा लॉकडाऊन लावावा लागेल.", मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा स्वातंत्र्य दिनी जनतेला इशारा
X
स्वातंत्र्य दिनी रविवारी मंत्रालयात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्याला संबोधित केले. या भाषणात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण केले. यानंतर त्यांनी कोव्हिडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपलं कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या कोव्हिड योध्द्यांना श्रध्दांजली वाहिली. याशिवाय कोव्हिड काळातील राज्याच्या कामगिरीचा आलेख वाचला. याशिवाय रूग्णसंख्या वाढल्यास पुन्हा एकदा लॉकडाऊन लावावा लागेल असा इशाराही जनतेला दिला.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सर्व प्रथम राज्यातील सर्व नागरिकांना अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच "छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीयांचे आक्रमण परतवून लावत खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची बीजे रुजवली. परकीयांविरुद्ध आपण लढून जिंकू शकतो, आक्रमण परतवून लावू शकतो हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवूनच दिलं नाही तर तसा विश्वासही आपल्याला दिला.", असे सांगत महाराजांच्या आठवणींना उजाळा दिला. याशिवाय "राजर्षी शाहू महाराजांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतेविरुद्ध लढा उभारून स्वातंत्र्य, समता म्हणजे काय हे सांगितले, त्यांनी स्वातंत्र्याचे महत्त्व आपल्याला पटवून दिले.", असे सांगत या महापुरूषांच्या स्मृतींना उजाळा दिला.
यावेळी राज्यातील राष्ट्रपती पदक तसेच इतर अनेक पुरस्कार विजेत्यां पोलिसांचे अभिनंदन मुख्यमंत्र्यांनी केले. "केवळ स्वातंत्र्याचा इतिहास डोळ्यासमोर ठेऊन स्वातंत्र्य दिन साजरा करण्याला महत्त्व नाही, हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. यात अनेकजण शहीद झाले. या सर्वांनी आपल्या समर्पणातून दिलेल्या स्वातंत्र्याची जपणूक करणे आपले कर्तव्य आहे.", असेदेखील मुख्यमंत्री यानिमित्ताने म्हणाले.
"कोरोनामुळे एक नवीन पारतंत्र्य आपण मागच्या दीड वर्षांपासून अनुभवत आहोत. आता आपण बरीच बंधने शिथिल करत आहोत. कोरोनाचे संकट अजूनही टळलेलं नाही. परदेशात काही ठिकाणी ते नव्याने उसळले आहे. आपल्याकडे हे संकट नव्याने उसळू नये म्हणून आपल्या सर्वांना काळजी घ्यायची आहे. गेल्या वर्षी आणि या वर्षीही आलेल्या दुसऱ्या लाटेत आपण कोरोनाचा कहर अनुभवला, आता काही प्रमाणात औषधं उपलब्ध झाली असली तरी ऑक्सिजनची अजूनही कमतरता आहे.
ऑक्सिजनचे प्रमाण लक्षात घेऊन आपण निर्बंधात शिथिलता आणत आहोत. ही शिथिलता आणत असलो तरी आपल्याला काळजी घेणे अत्यावश्यक आहे, त्यामुळे कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे, असे माझे नागरिकांना विनम्र आवाहन आहे. ऑक्सिजन क्षमता लक्षात घेतली आणि रुग्णसंख्या वाढू लागली तर नाईलाजाने पुन्हा एकदा लॉकडाऊन करावे लागेल.", असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला दिला.
"या संकटाचा सामना करण्यासाठी अनेक कोरोना योद्ध्यांनी दिवसरात्र संघर्ष केला. अनेकांना कोरोनाची बाधा झाली यात काहीजण बरे झाले काही जण दुर्देवाने शहीद झाले त्यांनाही मी श्रद्धांजली वाहतो.", असं म्हणत त्यांनी कोव्हिड योध्द्यांना श्रध्दांजली वाहिली.
"राज्यात लसीकरणाने आता वेग घेतला आहे. कालच ९.५ लाख नागरिकांचे लसीकरण करून राज्याने देशात उच्चांक गाठला आहे. आपण जिद्दीने कोरोनाविरूद्ध लढत आहोत.", असे सांगत त्यांनी राज्यातील लसीकरण मोहिमेचा चढता आलेख सांगितला.
"आपले हे स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी होत आहे. या निमित्ताने कोरोनापासून मी माझा देश, राज्य मुक्त करणार आणि पुढचा स्वातंत्र्य दिन मोकळेपणाने साजरा करणार", असा निश्चय त्यांनी राज्यातील जनतेला करायला सांगितला.