शिर्डीच्या साई मंदिर परिसरातील भिक्षेकऱ्यांवर आली उपासमारीची वेळ
शिर्डीचे साई मंदिर बंद असल्याने शिर्डीतील भिक्षेकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. मंदिर बंद असल्याने भाविकांची वर्दळ कमी आहे.त्यामुळे शासन-प्रशासनाने भिक्षेकऱ्यांसाठी मदत करण्याची मागणी होत आहे.
X
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लावण्यात आलेल्या लॉकडाउनचा फटका अनेकांना बसलेला आपण पाहिला आहे, मोठं - मोठे उद्योजक, व्यापारी यांना जसा लॉकडाऊनचा फटका बसला, तसाच तो भिक्षेकऱ्यांना देखील बसला आहे. आधीच दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या शिर्डीतील भिक्षेकऱ्यांची मंदिर बंद असल्याने अतिशय दयनीय अवस्था झाली आहे.
जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या , "सबका मालिक एक है।" चा संदेश देणाऱ्या शिर्डीच्या साईबाबा यांच्या मंदिर परिसरातील भिक्षेकऱ्यांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. देशात आणि राज्यात कोरोनाचं संकट आलं, आणि राज्यात लॉकडाउन सुरू झालं. सुरवातीला कोरोनाच्या या संकट काळात या भिक्षेकऱ्यांकडे सरकार, विविध सामाजिक राजकीय संघटनांचे लक्ष होते. त्यांना लॉकडाऊनच्या काळातही दोन वेळच पुरसं जेवण मिळत होतं. पण, कोरोनाचा कहर वाढला आणि परिस्थिती बदलली, अनेकांचे रोजगार गेले, अनेकांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली. मग जिथे स्वतःला खायला अन्न नाही तिथे या भिक्षेकऱ्यांचा विचार कोण करणार? एरवी देशविदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांमुळे दोन वेळच पोटभर अन्न मिळणाऱ्या या शेकडो भिक्षेकऱ्यांवर आणि त्यांच्या कुटुंबावर आता उपासमारीची वेळ आली आहे.
कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शिर्डीचं अर्थकारण ठप्प झालं आहे. मंदिर बंद असल्याने देश - विदेशातून येणारे भाविक देखील शिर्डीत येत नाहीत. त्यामुळे साई संस्थांनचे प्रसादालय देखील बंद आहे. सरकारने सुरू केलेली शिवभोजन थाळी देखील शिर्डीत कुठे मिळते याचा या भिक्षेकऱ्यांना पत्ता नाही. त्यामुळे येथील भिक्षेकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. एरवी देश विदेशातील भक्तांसाठी पाहिजे त्या सुविधा देणाऱ्या शिर्डी संस्थानने देखील या भिक्षेकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे ज्यांनी मुळातच गोरगरिबांसाठी स्वतःच आयुष्य वाहिलेल्या शिर्डीच्या साईंच्या शिकवणीचा संस्थानला देखील विसर पडला की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. "सरकार" या शब्दापुढे आपण "मायबाप" शब्द वापरतो, असे हे मायबाप सरकार तरी या भिक्षेकऱ्यांकडे लक्ष देणार का ? हे येत्या काळात पाहावं लागणार आहे.