Home > News Update > चोपडा येथील नाट्यगृहाची झाली दुरावस्था; नाट्यगृहाच्या दुरुस्तीची कलाप्रेमींची मागणी

चोपडा येथील नाट्यगृहाची झाली दुरावस्था; नाट्यगृहाच्या दुरुस्तीची कलाप्रेमींची मागणी

चोपडा येथील सौ. आक्कासाहेब शरदचंद्रीका सुरेश पाटील नाट्यगृहाची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे. या सभागृहाची तातडीने

चोपडा येथील नाट्यगृहाची झाली दुरावस्था; नाट्यगृहाच्या दुरुस्तीची कलाप्रेमींची मागणी
X

सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी बसलेला चोपडा तालुक्यात नगरपरिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात नव्हे असे भव्य नाट्यगृह बांधण्यात आले आहे. सौ. आक्कासाहेब शरदचंद्रीका सुरेश पाटील या नाट्यगृहाची सध्या प्रचंड दुरावस्था झालेली पाहायला मिळत आहे. सध्या जरी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नाट्यगृहातील कार्यक्रम होत नसले तरी देखील येत्या काळात पुन्हा कार्यक्रम सुरू होणार असल्याने या नाट्यगृहाची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे.

सौ. आक्कासाहेब शरदचंद्रीका सुरेश पाटील नाट्यगृहाच्या माध्यमातून चोपडा तालुक्यातील सांस्कृतिक कलाक्षेत्राला वाव मिळेल अशी तत्कालीन नगरपालिकेचे प्रशासन पदाधिकारी यांची भावना होती. याच भावनेतून त्यावेळी ज्येष्ठ सिनेअभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या हस्ते या सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले आहे. या नाट्यगृहात लक्ष्मीकांत बेर्डे , मोहन जोशी, रीमा लागू, प्रदीप पटवर्धन, रेणुका शहाणे अशा दिग्गज सिने आणि नाट्य अभिनेते-अभिनेत्रींनी नाटकाचे अनेक प्रयोग केले. मात्र गेल्या काही वर्षांपासून या नाट्यगृहाची प्रचंड दुरावस्था झाली आहे.

चोपडा शहरातील कलाक्षेत्रातील मंडळी आणि कला प्रेमींनी या नाट्यगृहाची ही अवस्था पाहून दुःख व्यक्त केलं आहे. या नाट्यगृहात प्रयोग सादर करताना कलाकारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रेक्षकांपर्यंत कलाकारांचा आवाज पोहोचत नाही, तंत्रज्ञांचा आवाज कलाकारांना ऐकू येत नाही. आसान व्यवस्थेची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे या कलामंदीराची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी कलाक्षेत्रात कार्यरत असलेल्या संजय बारी , मनोज चित्रकथी, सतीश बोरसे यांनी केली आहे.

दरम्यान याबाबत नगपालिका प्रशासनाकडे वारंवार मागणी केली जात असतांना देखील दुरूस्ती होत नसल्याबद्दल नगरपालिकेचे मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांना विचारले असता त्यांनी हे सभागृह प्रचंड मोठे असून त्याच्या दुरुस्तीसाठी किमान 50 लाखांच्या निधीची गरज असल्याचे म्हटलं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी लागणार असल्याने नगरपालिकेच्या सर्वसामान्य निधीतून त्यावर खर्च केला जाऊ शकत नाही. त्यासाठी शासनाकडे विशेष योजनेतून निधीची मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. शासनाकडून निधी प्राप्त होताच सभागृहाची दुरूस्ती करण्यात येईल असं गांगोडे यांनी म्हटलं आहे.

Updated : 5 Aug 2021 3:10 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top