पाचोरा शहरातील भुयारी मार्ग झाला जलमय; जनजीवन विस्कळीत
X
जळगाव जिल्ह्यात मागील काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे, दरम्यान पाचोरा शहरात पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे वाहतुकीवर देखील परिणाम झालेला पाहायला मिळाला. मुसळधार पावसामुळे परिसरातील सर्वच नदी, नाले ओसांडुन वाहु लागले. शहरातुन कृष्णापुरी भागातुन जाणारी हिवरा नदीलाही मोठा पुर आला होता. नदी काठावरील काही घरांमध्ये पाणी शिरुन नुकसानही झाले आहे. तसेच शहरातील रेल्वे भुयारी मार्गात तर तीन ते चार फुट पाणी साचल्याने भडगांव रोडकडून होणारी वाहतूक पुर्णत: बंद झाली होती. दैनंदिन कामासाठी नागरिकांना इतर मार्गाने वळसा घालून जावे लागत होते, तर काहींनी याच पाण्यातून आपली वाहने घातल्याचे पाहायला मिळाले. यावेळी अनेक वाहने हि पाण्यातून जाताना बंद पडत होती. अल्पसा पाऊस झाला तरी भुयारी मार्गात तुडुंब पाणी साचते. यामुळे हा मार्ग पुर्ण जलमय होतो.त्यामुळे नागरिकांना पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागतो. या होणाऱ्या त्रासामुळे नागरिकांमध्ये एकच नाराजीचा सुर पाहायला मिळत आहे. नगरपालिकेने याकडे लक्ष देऊन हा गंभीर प्रश्न मार्गी लावावा अशी मागणीही जनतेतून होत आहे.